www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
देशात सैनिकांकडून लहान मुलांचा अनन्वित छळ होत असल्याच्या वृत्ताला सीरिया सरकारनं नेहमीच नकार दिलाय. `यूएन`च्या अहवालानं मात्र या वृत्ताला दुजोरा दिलाय. सीरियामध्ये सुरू असलेल्या सरकार आणि विरोधात यांच्या यादवी संघर्षात लहान मुलांना बळी दिलं जातंय, हे या अहवालातून धडधडीतपणे समोर आलंय.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार गेल्या तीन वर्षांत सीरियामध्ये १०,००० लहान मुलांना मारण्यात आले. या अहवालानुसार सीरियातील सरकारच्या कैदेत असणाऱ्या अल्पवयीन मुलांवर अमानुष अत्याचार केले जात आहेत. सीरियातील सरकार कैदेत असणाऱ्या मुलांचा वापर आपल्या विरोधकांशी लढण्यासाठी करत आहे.
गेल्या आठवड्यात हा अहवाल संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेसमोर ठेवण्यात आला. या अहवालात गेल्या तीन वर्षात सीरियातल्या अल्पवयीन मुलांवर झालेल्या प्रभावांची चर्चा करण्यात आली आहे. सीरियातील सर्वच पक्षांनी अल्पवयीन लहान मुलांवर अत्याचार केल्याचं `यूएन`नं या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे.
अकरा वर्षांपर्यंतच्या मुलांना तुरूंगातील सराईत गुन्हेगारांसोबत एकत्र ठेवण्यात आले आहे. मारहाण करणे, विजेचा शॉक देणे, नखं उपटणे, बलात्कार, लैंगिक शोषण अशा अमानवी पद्धतीने कैदेतल्या मुलांची छळवणूक करण्यात आली, असं युनोच्या अहवालात म्हटलं गेलंय. सीरियातल्या गुप्तचर यंत्रणा आणि सीरिया सैन्यानं हे अत्याचार केल्याचा उल्लेख या अहवालात केला गेलाय.
सीरियन सरकारने युनोच्या अहवालातील सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. सीरियन सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधक अफवा पसरवत आहेत, असं मत सीरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केलयं. मात्र, `युनो`तर्फे याविरुद्ध केल्या जाणाऱ्या कारवाईबद्दल या अहवालात काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.