www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या जादूसमोर, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचा करिश्मा फिका पडतोय. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीआधी प्रियांका गांधी नावाचं ट्रम्प कार्ड काँग्रेसनं वापरायचं ठरवलेलं दिसतंय.
हुबेहुब इंदिरा गांधींची प्रतिमा असलेल्या प्रियांका गांधींमध्ये काँग्रेसला तारण्याची ताकद आहे का, असा सवाल आहे.
भारतीय राजकारणात नेहरू-गांधी घराण्याचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. या घराण्याने आतापर्यंत देशाला तीन पंतप्रधान दिलेत. मोतीलाल नेहरूंपासून सुरू झालेली ही परंपरा राहुल गांधींच्या रूपाने पाचव्या पिढीपर्यंत येऊन ठेपलीय.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला संपूर्ण बहुमत मिळून पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले आणि आधुनिक भारताची मुहूर्तमेढ रोवली. 1964 पर्यंत पंडित जवाहरलाल नेहरुंची भारतीय राजकारणावर मजबूत पकड होती. त्यानंतर इंदिरा गांधींनी आपली पकड मजबूत केली.
1977 मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं. 1979 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस विजयी झाली.
1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर नेहरु-गांधी घराण्याची चौथी पिढी राजकारणात आली. काँग्रेस विक्रमी मताधिक्यानं निवडून आली.
1991 साली राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी सोनिया गांधींनी राजकारणापासून दूर राहणंच पसंत केलं. परंतु 1997 मध्ये सोनिया गांधी राजकारणात आल्या. त्यावेळी भाजपचे वाजपेयी सत्तेवर आले. मात्र त्यांचं सरकार अल्पजीवी ठरलं. त्यानंतर दैवेगौडा आणि ए.के. गुजराल पंतप्रधान झाले.
1999 मध्ये भाजपचं सरकार सत्तेवर आलं आणि पाच वर्षं टिकलं. मात्र 2004 मध्ये भाजपप्रणित एनडीएचा पराभव करत काँग्रेसप्रणित यूपीए सरकार सत्तेवर आलं. तेव्हापासून सोनिया गांधी सत्तेचं केंद्र बनल्या.
2009 मध्ये काँग्रेसनं पुन्हा एकदा सत्ता काबीज केली.
काँग्रेस आणि नेहरू-गांधी घराण्याचा सत्ता प्रवास
1919 - मोतीलाल नेहरूंची काँग्रेस अध्यक्षपदी निवड
1929 - जवाहरलाल नेहरूंचा राजकारणात प्रवेश
1959 - इंदिरा गांधी बनल्या काँग्रेस अध्यक्षा
1980 - राजीव गांधी यांचं राजकारणात पहिलं पाऊल
1997 - सोनिया गांधींच्या खांद्यावर काँग्रेसची जबाबदारी
2004 - राहुल गांधींचा भारतीय राजकारणात उदय... आणि
2014 - प्रियंका गांधींचा करिष्मा काँग्रेसला तारणार?
2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींच्या नावाची घोषणा होणार, अशी अटकळ बांधली जातेय. परंतु चार राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची झालेली धूळधाण आणि राहुल गांधींच्या सभांना मिळणारा थंड प्रतिसाद, यामुळे आता काँग्रेसमधूनच दबक्या आवाजात राहुलबाबांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.
आधीच केंद्रातील काँग्रेसप्रणित आघाडी सरकारला अँटी इस्टॅब्लिशमेंटचा फटका पडण्याची भीती आहे. अशा अवघड परिस्थितीत काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी प्रियांका गांधींना राजकारणात सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू झालेत.
मंगळवारी काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीला प्रियांका गांधींनी देखील हजेरी लावली होती. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्यात.
प्रियांका गांधींना राजकारणाचं बाळकडू घरातच मिळालंय. इंदिरा गांधींची हुबेहूब प्रतिमा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. 1999 पासूनच काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये त्या सहभागी होत आहेत.
उत्तर प्रदेशातील सोनिया गांधींचा रायबरेली मतदारसंघ आणि राहुल गांधींचा अमेठी मतदारसंघ यावरच त्यांचं जास्त लक्ष केंद्रीत असतं. अमेठीमध्ये तर प्रियंका गांधी फारच फेमस आहेत. ‘अमेठी का डंका, बेटी प्रियांका’ ही घोषणाच त्याची साक्ष देते.
त्यामुळं आता हे ट्रम्प कार्ड 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला तारू शकेल, अशी शक्यता वर्तवली जातेय. आता बेटी प्रियांका खरंच काँग्रेसला नवी रोशनी दाखवण्यात यशस्वी होईल का, याचं उत्तर लोकसभा निकालानंतरच समजेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटर