www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`महायुती अभेद्य असून भाजप अन्य कोणत्याही मार्गानं जाणार नसल्याचं नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला आश्वस्त केलंय. त्यामुळं इतरांनी त्यावर बोलण्याची गरज नाही,` असं सांगत, `महायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा बंदोबस्त भाजपनं करावा,` असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठणकावलंय.
महायुतीतील संभ्रम आणि `सामना`मध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. महायुतीतील गैरसमजांबाबत माझी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे. या विषयावर आणखीही सविस्तर चर्चा होणार आहे, असंही उद्धव म्हणाले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना काँग्रेसला पाठिंबा देते, अंबरनाथमध्ये मनसेशी युती करते, ते उद्धव ठाकरे यांना कसं चालतं या सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, `कोणी कोणाला कुठं पाठिंबा दिला, का दिला या सगळ्या गोष्टींबाबत मी चव्हाट्यावर येऊन बोलायला तयार आहे. मागचं काढायचंच असेल बरंच काही बोलता येईल. पण माझी सध्या भाजपच्या अध्यक्षांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे इतरांनी मध्ये बोलू नये,` असा टोला उद्धव यांनी मुनगंटीवार यांना लगावला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.