Ganpat Gaikwad shooting: शुक्रवारी रात्री उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेतील महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.
घडलेल्या प्रकारावर बोलताना अजित पवार म्हणाले, "आमदाराचं झी 24 तासशी झालेलं बोलणं ते मी पाहिलं. मुळात कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ असून तो सर्वांसाठी समान आहे. सामन्य व्यक्ती असेल किंवा उच्च पदावरील व्यक्ती असेल सर्वांना नियम आणि कायदे सारखेच आहेत. इतक्या टोकाचा निर्णय का त्यांनी घेतला? चॅनेलला फोनवरून दिलेली माहिती देखील कायद्याला धरून नव्हती."
अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वाद होता. या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचा मुलगा पुत्र वैभव हे उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह त्याठिकाणी आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर गणपत गायकवाडांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. गणपत गायकवाड यांनी पाच राऊंड फायर केले. या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले. सध्या त्यांना उपचारांसाठी ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
गोळ्या झाडण्याच्या आरोपांबाबत विचारलं असता झी 24 तासशी बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, "पोलीस स्टेशनच्या दरवाज्यात माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्त कब्जा घेतला. मला मनस्ताप झाला आणि मी फायरिंग केली. होय मी गोळीबार केला आणि मला त्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. मला त्यांना जीवे मारायचं नव्हतं, पण पोलिसांसमोर असं माझ्या मुलाला कोणी मारत असेल तर आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे."
या गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळतेय. दरम्यान त्यांना आजच कोर्टात हजर केलं जाणार आहे. दुसरीकडे कल्याणचे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याचंही समजतंय.