Railway Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. यात 12 लाखाहून कमी उत्पन्न असलेल्यांना करात सवलत देण्यासह विविध महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे बजेटसंदर्भात माहिती दिली. त्यांच्या या घोषणेनंतर देशवासियांचा रेल्वे प्रवास किती सोपा होणार आहे, याचा अंदाज येईल. काय म्हणाले रेल्वेमंत्री? यामुळे देशवासियांना कसा फायदा होणार? जाणून घेऊया.
पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेसाठी 17 हजार 500 सामान्य कोच, 200 वंदे भारत आणि 100 अमृत भारत गाड्यांच्या निर्मितीसारख्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली. 2025-26 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केल्यानंतर वैष्णव यांनी रेल भवन येथे पत्रकारांशी बोलताना रेल्वेसाठी वाटप केलेल्या प्रकल्पांची आणि आगामी खर्चाची माहिती दिली.
अर्थसंकल्पात 4.6 लाख कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. जे चार ते पाच वर्षांत पूर्ण होतील. नवीन रेल्वे मार्ग टाकणे, विद्यमान रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, नवीन बांधकाम, स्थानकांचा पुनर्विकास आणि उड्डाणपूल आणि अंडरपास सारख्या कामांशी संबंधित हे प्रकल्प असतील अशी माहिती त्यांनी दिली.
रेल्वे प्रवासाची वाढती मागणी लक्षात घेता पुढील 2-3 वर्षांत 100 अमृत भारत, 50 नमो भारत आणि 200 वंदे भारत गाड्या बांधल्या जाणार असल्याचे यावेळी रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. नवीन अमृत भारत गाड्यांमुळे इतर अनेक कमी अंतराच्या शहरांनाही जोडले जाणार असल्याचे ते म्हणाले.
गाड्यांमध्ये जनरल कोचच्या कमतरतेबद्दल त्यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावर वैष्णव म्हणाले की, येत्या काळात असे 17 हजार 500 कोच तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.सामान्य कोचचे उत्पादन आधीच सुरू आहे आणि 31 मार्च अखेरपर्यंत असे 1 हजार 400 कोच तयार होतील. पुढील आर्थिक वर्षात 2 हजार सामान्य कोच बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. यासोबतच 1 हजार नव्या फ्लायओव्हरच्या बांधकामांना मंजूरी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भारतीय रेल्वे 31 मार्च 2025 पर्यंत मालवाहतूक क्षमतेशी संबंधित एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. आम्ही 31 मार्चपर्यंत 1.6 अब्ज टन माल वाहून नेण्याचे लक्ष्य साध्य करू आणि भारतीय रेल्वे जगात मालवाहतुकीच्या बाबतीत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल आणि भारतीय रेल्वे वाहतूक करण्याचे लक्ष्य साध्य करेल असे ते यावेळी म्हणाले. तसेच सरकार 2025 पर्यंत 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी वैष्णव यांनी रेल्वेच्या सुरक्षेवर भाष्य केले. यासाठी केंद्र सरकारने 1.8 लाख कोटी रुपयांवरून 1.14 लाख कोटी रुपये इतकी तरतूद केली आहे. पुढील आर्थिक वर्षात हा आकडा 1.16 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवला जाईल, असे ते म्हणाले. जर सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत येणारी गुंतवणूकही यामध्ये जोडली तर एकूण बजेट 2.64 लाख कोटी रुपये होईल, असेही ते म्हणाले.