स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पार्टी करताना बंद असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून एका 19 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शुक्रवारी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा करत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी (Navi Mumbai Police) तरुणीच्या मित्रांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरु केली आहे.
गुरुवारी संध्याकाळी नवी मुंबईच्या बेलापूर मधील सेक्टर 15 मधील एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावरून एका 19 वर्षीय तरुणीचा पडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह तात्काळ रुग्णालयात पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी तिच्या दोन मित्रांसह पार्टी करण्यासाठी या पडीक इमारतीत गेली होती.
ही तरुणी तिच्या मित्राच्या घरी गेल्या दोन दिवसांपासून राहत होती. गुरुवारी सकाळी मित्राने त्याच्या आणखी एका मित्राला घरी बोलावून पार्टी करण्याचा बेत आखला. सर्व तयारी केली मात्र तरुणी आणि तिच्या मित्राने घरी नको म्हणून बाहेर जाऊन पार्टी करण्याचे ठरवले. घरी आई येईल म्हणून तिघेही बेलापूर मधील एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावर जाऊन बसले. त्यानंतर तिघांची पार्टी सुरु झाली.
पार्टी ऐन रंगत असताना तरुणीचा मित्र लघुसशंकेसाठी उठून बाजूला गेला. त्याचवेळी तरुणीही त्याच्या मागून गेली. मात्र अंधाराचा अंदाज न आल्याने तरुणी पाय घसरून थेट इमारतीवरुन खाली पडली. या दुर्घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला आहे. प्राथमिक माहिती नुसार तरुणीने मद्याचे सेवन केले असल्याने पाय घसरून पडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
"ही तरुणी एका अपूर्ण आणि पडक्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर दारू पार्टीचा आनंद घेत असलेल्या मित्रांच्या गटाचा भाग होती. प्राथमिक तपासानुसार, पीडिता चुकून खाली पडून जागीच मरण पावल्याचे पोलिसांना आढळून आले. मात्र, पोलीस याची पडताळणी करत आहेत. रात्रीच्या अंधारात कोणाचेही लक्ष न गेल्याने ही तरुणीचा तोल गेला आणि ती थेट खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. सध्या या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मात्र, तपासानंतर गुन्हा दाखल केला जाईल," अशी माहिती पोलिसांनी दिली.