मुंबई : मुलुंडमध्ये ऑनलाईन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या सट्टेबाजीचे रॅकेट उधळून लावण्यास पोलिसांना यश आले आहे. मुलुंडच्या लालबहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या एका इमारतीत असलेल्या घरात छापा मारून ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बेसली २०१९ या क्रिकेट लीग सामन्यावर हा सट्टा लावण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हा क्रिकेटवर सट्टा 'क्रिकेट माझा' या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून लावण्यात येत होता. ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या चार सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे. यात आकाश गुलखा, जितेंद्र गुलखा, धर्मेश खांत, प्रतिक देडिया या सट्टेबाजांचा हात असल्याचे पुढे आले आहे. पोलीस परिमंडळ सातचे उपायुक्त अखिलेश सिंग यांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी छापा टाकला.
मुलुंड लालबहादूर शास्त्री मार्गावर एका इमारतीत ऑनलाइन सट्टा खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या ठिकाणी मुलुंड पोलिसांनी छापा मारला. ही टोळी ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बॅश २०१९ या क्रिकेट लीग सामन्यांवर सट्टा लावताना आढळून आली. पोलिसांनी त्यांच्याकडून १६ मोबाईल, दोन लॅपटॉप, एक राउटर आदीसह एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांनी दिली.