Mumbai Local Train Update: लोकलमधून प्रवास करणे म्हणजे गर्दीही आलीच. याच गर्दीचा फायदा घेत एका माथेफिरुने दादर स्थानकात एका महाविद्यालय तरुणीचे केस कापले. त्यानंतर घटनास्थळावरुन पोबारा केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे,
मुंबईतील एका लोकप्रिय महाविद्यालयातील पीडित विद्यार्थिनी लेडिज स्पेशल लोकलमधून कल्याण ते माटुंगा रोड असा प्रवास करत होती. त्यासाठी ती सकाळी 9.29 च्या सुमारास दादर स्थानकात पोहोचली होती. ती पश्चिम रेल्वेच्या फूट ओव्हर ब्रिजकडे चालत असताना तिच्या मागून एक अज्ञात व्यक्ती आला आणि त्याने तिचे केस कापले.
पीडित विद्यार्थ्यीनीने रेल्वे पोलिसांना याबाबत तक्रार दिली. तिकिट खिडकीजवळून जात असताना तिला काहीतरी टोचल्यासारखे वाटले तेव्हा तिने मागे वळून पाहिले. तेव्हा एक व्यक्ती बॅग घेऊन घाईघाईत जाताना दिसला. नंतर तिला काहीतरी संशयास्पद वाटले तेव्हा तिने तिच्या केसांचे निरीक्षण केले तेव्हा पाठीमागचे अर्धे केस कापल्याचे लक्षात आले. तसंच, खालीदेखील काही केस पडले होते. केस कापल्याचे लक्षात येताच तिला धक्का बसला. तिने त्या व्यक्तीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला. त्यानंतर पीडित तरुणीने लगेचच RPF ला याबाबत माहिती दिली.
रेल्वे पोलिसांनी याबाबत सीसीटीव्ही तपासले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींनी पोलिसांनी या माथेफिरुला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. त्याने तरुणीचे केस का कापले, याचा तपास करण्यात येत आहे. मात्र, या घटनेमुळं लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला प्रवासी संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.