Akshay Kumar Film Bhoot Bangala: बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. चाहते त्याच्या आगामी चित्रपटांना घेऊन उत्सुक आहेत. अक्षयने त्यातील काही चित्रपटांचे शूटींग पूर्ण केले असून काहींच्या आता तयारीत असण्याची चर्चा सुरू आहे. अक्षय सध्या प्रियदर्शनचा 'भूत बंगला' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे. 15 वर्षांनंतर तो प्रियदर्शनच्या चित्रपटात झळकणार असल्याने चाहतेसुद्धा या चित्रपटाची वाट पाहत आहेत.
एकता कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एप्रिल 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'भूत बंगला' हा हॉरर चित्रपट असून या चित्रपटात अक्षय कुमार आणि तब्बू मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नुकतंच, 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, अक्षय आणि तब्बूने चित्रपटातील एका क्लासिकल डान्सचे शूटींग पूर्ण केले असल्याचे वृत्त समोर आले आहे. हैदराबाद मध्ये या डान्सचे शूटींग करण्यात आले आहे. खरंतर तब्बूचा क्लासिकल डान्सचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे. चित्रपटातील हे गाणं प्रीतम यांनी कंपोज केलं आहे.
अक्षय कुमारच्या या हॉरर् चित्रपटात कॉमेडी सीन्ससुद्धा पाहायला मिळणार आहेत. अक्षयसोबत या चित्रपटात तब्बू व्यतिरिक्त परेश रावल, राजपाल यादव, असरानी आणि वामिका गब्बी देखील काम करत आहेत. नुकतंच 'भूत बंगला'च्या पूर्ण टीमने हैदराबादमध्ये चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनचे शूट केले आहे. लवकरच चित्रपटाचे अंतिम शेड्यूल सुरू होणार असून, त्याची तयारी सुरू आहे.
चित्रपटातील अक्षय कुमारसोबत तब्बूचा क्लासिकल डान्सचा हा सिक्वेंस 'हायलाईट मोमेंट' असल्याचे सांगितले जात आहे. अक्षय कुमारच्या 'भूल भुलैया'या चित्रपटातदेखील एक अक्षयचा जबरदस्त डान्स सेट करण्यात आला होता. भूल भुलैय्या' मध्ये अभिनेत्री विद्या बालनवर लक्ष केंद्रित केले गेले होते. असाच काहीसा प्लॅन 'भूत बंगला' या चित्रपटात साकारला जाणार आहे. हा चित्रपट 'कॉमिक-केपर' म्हणून ओळखला जात आहे. वामिका गब्बी ही मुख्य भूमिकेत तर मिथिला पालकर ही बहिणीच्या भूमिकेत झळकणार आहे .