मुंबईत आढळला गिया बार्रेचा पहिला रुग्ण? अंधेरीतील तरुणामध्ये लक्षणं, रुग्णालयात दाखल

GBS Patient in Mumbai: मुंबईत गिया बार्रेचा पहिला रुग्ण आढळला आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहणारा हा व्यक्ती असून त्याच्यावर महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 7, 2025, 02:00 PM IST
मुंबईत आढळला गिया बार्रेचा पहिला रुग्ण? अंधेरीतील तरुणामध्ये लक्षणं, रुग्णालयात दाखल title=
(प्रातिनिधिक फोटो)

GBS Patient in Mumbai: मुंबईत गिया बार्रेचा पहिला रुग्ण आढळला आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एका पुरुषाला दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच गुडलेन बॅरे सिंड्रोम जीबीएस आजाराची लागण झाल्याचे समोर आलं आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहणारा हा व्यक्ती असून त्याच्यावर महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु अद्याप बीएमसीकडून अधिकृतरित्या ही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. 

अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली. तसंच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी 50 विशेष बेड राखीव ठेवण्याची सूचना केली. शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. 

गिया बार्रेमुळे 6 जणांचा मृत्यू

गिया बार्रेमुळे पुण्यात आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे गिया बार्रेच्या बळींची संख्या 6 वर गेली आहे. पुण्यात गिया बार्रेच्या रुग्णांची संख्याही सातत्यानं वढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

'जीबीएस'ची कारणं काय?

गिया बार्रे होण्याची विविध कारणं आहेत. जसं की बॅक्टेरिअर इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे या गोष्टी आजाराला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. सिंहगड रोडवरील किरकिटवाडी, नांदेडगाव, नांदोशी, कोल्हेवाडी, धायरी आदी गावांना विहिरीतून पाणीपुरवठा होतो.  धरणातून आलेलं पाणी कुठलीही प्रक्रिया न करता,  ब्लिचिंग पावडर मिसळून नागरिकांना दिलं जातं. त्यामुळे या विहिरीतील दूषित पाणीच आजाराचं मूळ असल्याचं सांगितलं जात आहे. 

'जीबीएस'ची लक्षणं काय?

गिया बार्रे सिंड्रोम हा एक हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. जाणून घ्या या आजाराची लक्षणं काय... 

- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
- स्नायु कमकुवत होतात.
- हात, पायात मुंग्या येतात.
- अशक्तपणा जाणवू लागतो.
- बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणं.
- धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणं.