Rahul Gandhi 5 important claims: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि कांग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालात गोंधळ झाल्याचे ते म्हणाले. आमच्या टिमने यावर काम केले असून मतदार आणि मतदान यादीत गोंधळ असल्याचे आम्हाला आढळल्याचे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी कोणते 5 महत्वाचे दावे केलेयत? जाणून घेऊया.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीतून अल्पसंख्यांकांची नावे वगळण्यात आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलाय. महाराष्ट्रातील 3 मोठे पक्ष निवडणूक आयोगाकडे वोटर लिस्ट मागत आहेत. पण वोटर लिस्ट आम्हाला उपलब्ध करुन दिली जात नसल्याचे ते म्हणाले.
'2019 च्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान 5 वर्षांत 32 लाख मतदार जोडले गेले. लोकसभा 2024 आणि विधानसभा निवडणुकांमधील 5 महिन्यांच्या कालावधीत 39 लाख मतदारांची भर पडली. मग हे 39 लाख मतदार कोण आहेत? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. वाढलेल्या नव्या मतदारांचा आकडा हा हिमाचल प्रदेशातील एकूण मतदारांइतका आहे. महाराष्ट्रात राज्यातील एकूण मतदारसंख्येपेक्षा जास्त मतदार का आहेत? महाराष्ट्रात अचानक मतदार निर्माण झाल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय.
राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार नेत्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना (यूबीटी) यांच्यासोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्र सरकारच्या मते राज्यात 9.54 कोटी प्रौढ आहेत. निवडणूक आयोगाच्या मते महाराष्ट्रात 9.7 कोटी मतदार आहेत. याचा अर्थ असा की आयोग जनतेला सांगत आहे की महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार आहेत. हे कसे शक्य आहे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला.
#WATCH | Delhi | Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "...In 5 years between the Vidhan Sabha elections in 2019 and Lok Sabha, 2024 - 32 lakh voters were added. However, in period of 5 months between Lok Sabha 2024 which these parties (Congress, NCP-SCP, Shiv Sena… pic.twitter.com/ixM1aU2J7O
— ANI (@ANI) February 7, 2025
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत कामठी विधानसभा जागेचा उल्लेख केला. काँग्रेसला लोकसभेत 1.36 लाख आणि विधानसभेत 1.34 लाख मते मिळाली पण भाजपची मते 1.19 लाखांवरून 1.75 लाख झाली. याचा अर्थ नवीन मतदारांनी भाजपला मतदान केले. आम्हाला दोन्ही निवडणुकांसाठी मतदार यादीची माहिती हवीय, अशी मागणी राहुल गांधींनी यावेळी केली. मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात वगळण्यात आली आहेत. त्यापैकी बहुतेक दलित मतदार आहेत. निवडणूक आयोग प्रश्नांची उत्तरे देत नाही.
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्राची मतदार यादी मागितली. निवडणूक आयोग आम्हाला यादी का देत नाही? असा सवाल त्यांनी केला. आम्हाला मतदार यादीची संपूर्ण माहिती हवीय असे म्हणत त्यांनी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीतून सरन्यायाधीशांना काढून टाकण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी 2 नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली.निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्याचे ते यावेळी म्हणाले.