शिंदेंच्या पक्षाकडून ठाकरेंच्या शिवसेनेची मूळव्याधीशी तुलना; म्हणाले, 'दुखतंय पण...'

Shinde Shivsena vs UBT Shivsena: दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपली. नेमकं कोण कोणाला आणि कशावरुन काय म्हणालं आणि हा वाद का निर्माण झालाय जाणून घ्या.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 7, 2025, 12:29 PM IST
शिंदेंच्या पक्षाकडून ठाकरेंच्या शिवसेनेची मूळव्याधीशी तुलना; म्हणाले, 'दुखतंय पण...' title=
ठाकरेंच्या सेनेवर केली टीका

Shinde Shivsena vs UBT Shivsena: 'ऑपरेशन टायगर'वरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या पक्षाला मूळव्याधीची उपमा दिली आहे. ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिंदेंच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी हा टोला लगावला आहे. 

राऊत नक्की काय म्हणाले?

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदेंच्या शिवसेनेनं 'ऑपरेशन टायगर' हाती घेतल्याचं वृत्त आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार असून याला 'ऑपरेशन टायगर' असं नाव देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी, "ऑपरेशन टायगर, ऑपरेशन कमळ होईल पण ऑलरेडी ऑपरेशन रेडा झाला आहे," अशी खोचक प्रतिक्रिया नोंदवली. पुढे बोलताना, "ते चुकीचा आकडा सांगत आहेत. त्यांनी सगळाच आकडा घेतला पाहिजे," असा टोलाही त्यांनी लगावला. "काल आम्ही सगळे पक्षाचे खासदार सोबत होतो. राहुल गांधी दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या याद्या बाबत पुरावे देणार आहेत. फडणवीस रोज त्यांचं ऑपरेशन करत आहेत. शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाऊ शकतो. त्यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे," असा टोला राऊतांनी लगावला.

शिंदेंच्या पक्षाकडून त्याच भाषेत उत्तर

संजय राऊतांनी शिंदेंच्या पक्षाला भाजपाच्या पोटातील अपेंडिक्स म्हटल्याने शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्याच भाषेत उत्तर दिलं आहे. पत्रकारांशी बोलताना नरेश म्हस्केंनी, अपेंडिक्स पोटात असतं पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध आहे असा टोला लगावला आहे. "महामंडलेश्वर संजय राऊत बांडगुळाची भूमिका करत आहेत. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेची माहिती संजय राऊत देत होते किती वाईट अवस्था झाली आहे शिपायाचं काम राऊत यांना करावे लागते," असा टोमणा म्हस्केंनी मारला.

ठाकरेंच्या पक्षात तिघेच राहतील

एवढ्यावरच न थांबता, "अपेंडिक्स पोटात असतं मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मुळव्याध कुठे असतं सांगायची गरज नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला घरघर लागली आहे, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत तिघेच तिकडे राहतील," असंही म्हस्के म्हणाले.

आमचं काय कोण ऑपरेशन...

पत्रकारांनी यानंतरही नरेश म्हस्केंना 'ऑपरेशन टायगर'वरुन प्रश्न विचारला असता. म्हस्केंनी, "आमचं काय कोण ऑपरेशन करत असतील तर ते आम्ही बघून घेऊ. पण आपली अवस्था मूळव्याधीप्रमाणे ठेवली आहे. दुखतंय पण दिसत नाही. पाहता येत नाही. बांडगुळाप्रमाणे करुन ठेवली आहे ती प्रथम पहावी," असा टोला लगावला.