Mumbai Real Estate : मुंबईत घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. या शहरातील मूळ रहिवासी असो किंवा नव्यानं या शहरात आपली ओळख तयार करण्यासाठी आलेली एखादी व्यक्ती असो. मुंबईनं कायमच प्रत्येकाला आपलंसं केलं आहे. अशा या मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न मागील काही वर्षांमध्ये मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.
शहरातील चाळ संस्कृती लोप पावत असून, नजर जाईल तिथं गगनचुंबी इमारतींची गर्दी पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही मुंबईचा 'चार्म' काही कमी झालेला नाही हे खरं. व्यावसायिक म्हणू नका किंवा कलाकार, खेळाडू, नेते... या शहरात अनेकांनीच आपला आशियाना तयार केला आहे. त्यातच आता आणखी एका धनाढ्य व्यक्तीमत्त्वाची भर पडली आहे. त्या व्यक्तीचं नाव, उदय कोटक. (Uday Kotak Appartment Deal)
कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबानं मुंबईतील दक्षिण मुंबईतील एका रेसिडेंशिअल कॉम्ल्पेक्समध्ये एकदोन नव्हे, तर तब्बल 12 घरं खरेदी केली आहेत. Zapkey.com च्या वृत्तानुसार या व्यवहारात त्यांनी तब्बल 202 कोटी रुपये मोजले असून, हे सर्व फ्लॅट शिवसागर बिल्डींग नावाच्या ठिकाणी असल्याचं सांगण्यात येत आहे.
नजरेसमोर अथांग समुद्र दिसणाऱ्या या फ्लॅटमधून संधीप्रकाशात न्हाऊन निघालेली मुंबई आणि चकाकणारं पाणी असं विलोभनीय दृश्य दिसतं. प्रति चौरस फुटांच्या दरानं या जागेची किंमत पाहिल्यास हा आकडा 2.71 प्रति चौ.फूट इतका होतो. एखाद्या लोकवस्तीच्या ठिकाणी असणाऱ्या घराला इतका दर मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भागात अनेक व्यावसायिक धनिक वास्तव्यास असल्यानंही इथं घरांचे दर गगनाला भिडल्याचं सांगितलं जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार कोटक कुटुंबीयांनी या घराच्या स्टॅम्प ड्युटीसाठी तब्बल 12 कोटी रुपये इतकी किंमत मोजली आहे. याशिवाय 3.60 लाख रुपये नोंदणी फी दिली असून, 5 सप्टेंबर 2024 रोजी 12 पैकी एका फ्लॅटची नोंदणी झाली. उर्वरिक 11 घरांची नोंदणी यानंतर, डिसेंबर महिन्यात करण्यात आली. 173 चौ.फूट ते 1396 चौ.फूट दरम्यान या सर्व फ्लॅटचं क्षेत्रफळ असून, 12 फ्लॅटचं एकूण क्षेत्रफळ आहे 7418 चौरस फूट.
मुंबईत कायमच घरांच्या विक्रीचे नवनवीन विक्रम रचले गेल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच आता हा एक नवा व्यवहार असून, त्याआधी दक्षिण मुंबईतीलच अल्टामाउंट रोड आणि भूलाभाई देसाई रोड इथंही काही व्यवहारांदरम्यान घसघशीत रक्कम मोजण्यात आली होती. जिथं अनुक्रमे 2.25लाख आणि 2.09 लाख (प्रति चौ. फूट) इतकी रक्कम मोजण्यात आली होतीय. थोडक्यात मुंबईत फक्त इमारतीच नव्हे, तर शहरातील घरांचे दरही गगनाला गवसणी घालत आहेत, म्हणूनच या शहराला मायानगरी म्हणणं गैर नाही.