मुंबई : बहुचर्चित शिवस्मारकावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. कोट्यवधी रुपयांच्या शिवस्मारक प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. तर माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
शिवस्मारकावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं राजकारण पेटलं आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची घोषणा होऊन अनेक वर्षं उलटली. मात्र अद्याप त्याची एक वीटही रचण्यात आलेली नाही. त्याआधीच शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
कॅगच्या अहवालाच्या आधारे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी त्यात हात धुवून घेतल्याचं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे. तर प्रशासकीय मान्यता न घेताच २ हजार ६९२ कोटींची निविदा काढण्यात आली. शिवरायांच्या स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार व्हावा, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
शिवस्मारकाच्या कामात एका रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. सरकारनं कोणतीही चौकशी करावी, असं आव्हान माजी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तोफा डागतायत. मात्र या राजकारणात शिवस्मारकाचं काम रखडतंय, याची खंत दुर्दैवानं कुणालाच नाही.