Dimuth Karunaratne : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 19 फेब्रुवारी पासून ही स्पर्धा सुरु होणार असून यापूर्वीच एका दिग्गज क्रिकेटरने निवृत्तीची घोषणा केली आहे. श्रीलंकेचा स्टार क्रिकेटर दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो त्याचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
सध्या श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. या सीरिजचा पहिला टेस्ट सामना 29 जानेवारी पासून सुरु झाला होता. यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा एक डाव आणि 242 धावांनी पराभव केला. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा आणि शेवटचा सामना हा 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. श्रीलंकेत होणारा हा टेस्ट सामना दिमुथ करुणारत्ने त्याच्याकरता अतिशय खास असून हा त्याचा 100 वा टेस्ट सामना असणार आहे. 100 वा टेस्ट सामना खेळून दिमुथ करुणारत्ने हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. दिमुथ करुणारत्ने हा श्रीलंकेच्या टेस्ट आणि वनडे संघाचा माजी कर्णधार देखील आहे.
हेही वाचा : दिग्गज क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकी सध्या काय करतात? कोणी अभिनेत्री तर कोणी CA
DIMUTH KARUNARATNE RETIRING FROM CRICKET
Karunaratne will be playing his 100th Test against Australia during the 2nd Test and he will be retiring from International cricket after the match. [Sportspavilion] pic.twitter.com/n3gt91FLx6
Johns. (CricCrazyJohns) February 4, 2025
दिमुथ करुणारत्ने हा श्रीलंकेकडून क्रिकेटच्या वनडे आणि टेस्ट अशा दोनच फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने 99 टेस्टमध्ये 7172 धावा केल्या असून यात 1 द्विशतक, 16 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दिमुथने 50 वनडे सामने खेळवले जात असून यात 1316 धावा केल्या आहेत. यात त्याने 1 शतक आणि 11 अर्धशतक ठोकली आहेत. 2012 मध्ये दिमुथ करुणारत्नेने न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर 2011 मध्ये इंग्लंड विरुद्ध त्याने वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते.
श्रीलंका क्रिकेट संघ हा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी क्वालिफाय करू शकला नाही. त्यामुळे यंदाच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये श्रीलंकेचा समावेश नसेल. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीची लढत 8 संघांमध्ये होणार असून यात ग्रुप ए मध्ये पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश तर ग्रुप बी मध्ये दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड यांचा समावेश असेल. 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून यंदा ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलने खेळवली जाणार असल्याने त्याचे सामने पाकिस्तान आणि दुबई इत्यादी ठिकाणी होतील.