Jalna Bus Accident News: जालन्यात बस अपघाताची घटना घडली आहे. बसचा ब्रेक न लागल्यामुळे बसचा अपघात झाला आणि बस थेट जालन्यातील अंबड बस स्थानकात घुसली. यामुळे तिथे असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ही घटना घडताच तिथे असणाऱ्या प्रवाशांनी लगेच बसमधील प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत 1 जण जागीच ठार झाला असून या घटनेत 7 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना लगेच जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये एका दीड वर्षांच्या लहान बाळाचा देखील समावेश आहे.
जालन्यात गेल्या काही दिवसांपासून सतत एसटी बसचे अपघात होताना दिसत आहेत. यामध्ये 14 डिसेंबर 2024 रोजी जालाना-नाव्हा या परिसरात बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला होता. या घटनेत 2 प्रवाशी जागीच ठार झाले होते. तर 20 प्रवाशी जखमी झाले होते. ही बस माहूरगडाकडे जाणारी बस होती. ती नाव्हा या परिसरात येताच तिला समोरून येणार्या टेम्पोने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये टेम्पो आणि बसचा चक्काचूर झाला.
जालन्यात बस अपघाताचे सत्र सुरूच
जालना जिल्ह्यातील जाफ्राबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसचा देखील 24 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. ही बस जाफ्राबादहून चिखलीकडे जात होती. ही बस कोळेगाव फाट्याजवळ येताच भीषण अपघात झाला. हा अपघात एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने झाला होता. घाट रस्ता चढत असताना हा अपघात झाला अन् बस थेट 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या घटनेत 15 ते 16 प्रवासी जखमी झाले होते. जखमींना चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.