Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम

Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 20, 2024, 02:44 PM IST
Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम title=
मुख्यमंत्र्यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये निवेदन केलं. आरोपी कोणीही असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असं आश्वासन देतानाच मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांची बदली केली जाणार असल्याची घोषणा केली. तसेच या प्रकरणामध्ये पोलीस महानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तसेच न्यायालयीन चौकशीही केली जाणार असल्याचं फडणवीसांनी सभागृहाला सांगितलं. एवढ्यावरच न थांबता संतोष देशमुख यांच्याबरोबर नेमकं काय घडलं हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सविस्तरपणे सांगितलं. 

संपूर्ण घटनाक्रम मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

"मस्साजोग प्रकरण अत्यंत गंभीर आहे. हे प्रकरण केवळ हत्येपर्यंत मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खणून बीड जिल्ह्यातील कायद्याची स्थिती बदलावी लागेल," असं मुख्यमंत्री म्हणाले. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणातील घटनाक्रम सांगितला. "आवादा एनर्जीने बीड जिल्ह्यात सोलर प्रकल्पातून मोठी गुंतवणूक केली आहे. ही कामे आम्हाला द्या, अन्यथा आम्हाला खंडणी द्या म्हणत तिथे अनेकजण वावरत आहेत. तसाच प्रकार 6 डिसेंबर 2024 रोजी घडला. मस्साजोग येथील कंपनीच्या कार्यालयात आरोपी गेले. त्यांनी वॉचमनला शिवीगाळ आणि मारहाण केली. यावेळी आरोपींकडून अधिकाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यावेळी स्थानिक सरपंच संतोष देशमुख तिथे आले. दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये मारहाण झाल्याचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला," असं फडणवीस म्हणाले. 

नक्की वाचा >> महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्याकांडात वाल्मिक कराडचं नाव का घेतलं जातंय? तो आहे तरी कोण?

काळ्या रंगाची स्कॉर्पिओ तिथे...

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, "9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख एकटेच आपल्या गावी जात होते. पेट्रोलपंपावर आत्येभावाला भेटले तिथून ते दोघे निघाले. त्यावेळी टोलनाक्यावर त्यांची गाडी पोहोचली तेव्हा टोलनाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि अजून एक गाडी त्यांची वाट पाहत होते. गाडी टोलवरुन पुढे गेल्यावर गाडी आडवली. त्यांनी आधी चालकाच्या बाजूच्या गाडीची काच फोडली. त्यानंतर त्यांना कळलं की संतोष हे दुसऱ्या बाजूला बसले. त्यांनी दुसऱ्या बाजूची काच फोडून संतोष यांना बाहेर काढलं. नंतर त्यांना गाडीमध्येच तारांनी मारहाण केली. संतोष जिवंत नाही हे समजल्यावर त्यांनी तिथेच त्यांना सोडून पळ काढला. सरपंचाचा भाऊ विष्णू चाटेच्या संपर्कात होता. संतोषला सोडतो म्हणायचा पण सोडत नव्हता, या मारहाणीत संतोष यांचा मृत्यू झाला," असं सांगितलं.

नक्की वाचा > 'माज उतरल्याशिवाय...,' कल्याणमधील राड्यावरुन CM फडणवीसांचा इशारा; Veg-Non-Veg वादावरही बोलले

"29 नोव्हेंबर रोजी  वाल्मिक कराडने वीज कंपनीला काम बंद करण्याची धमकी दिली होती. 2 कोटी द्या अन्यथा काम बंद करा असे कराडने सांगितले, धमक्या दिल्या हा गुन्हा आधी घडला. त्यामुळे खंडणी आणि हत्या या दोन्ही प्रकारांचा तपास सुरू आहे," असंही फडणवीस म्हणाले. 

कारवाई करणारच

"बीड प्रकरणात मास्टर माईंड कुणीही असो कारवाई करणारच," असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. या प्रकरणामध्ये बीडचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बीडचे माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड यांचा थेट संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत. फडणवीस यांनी थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेत सभागृहामध्ये विधान केलं. "वाल्मिक कराडबद्दल पुरावे असतील, कुणासोबत फोटो असतील याचा विचार न करता कारवाई केली जाईल," असं फडणवीस यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितलं.