धनंजय मुंडे महायुतीत एकाकी पडले? आरोप आणि टीकांवर अखेर सोडलं मौन, म्हणाले 'माझी...'

धनंजय मुंडे महायुतीत एकाकी पडले? आरोप आणि टीकांवर अखेर सोडलं मौन, म्हणाले 'माझी...'

विरोधकांसह महायुतीच्या नेत्यांकडून टीका होत असताना धनंजय मुंडे एकाकी पडल्याची स्थिती आहे.

शिवराज यादव | Updated: Dec 26, 2024, 09:05 PM IST
धनंजय मुंडे महायुतीत एकाकी पडले? आरोप आणि टीकांवर अखेर सोडलं मौन, म्हणाले 'माझी...' title=

बीडमधील गुन्हेगारीच्या मुद्यावरुन धनंजय मुंडे आरोपांच्या चक्रव्युहात सापडले आहेत. विरोधकांसह महायुतीच्या नेत्यांकडून टीका होत असताना धनंजय मुंडे एकाकी पडल्याची स्थिती आहे. धनंजय मुंडेंनी आता या प्रकरणात मीडिया ट्रायल सुरु असल्याचा आरोप केला आहे.

बीडमधील गुन्हेगारीवरुन धनंजय मुंडेंवर सातत्यानं टीका होत आहे. वाल्मिक कराडच्या आडून नाव न घेता आरोप झाले. नंतर मात्र धनंजय मुंडेंवर थेट आरोप सुरु झाले आहेत. एका बाजूने बीडमधील गुन्हेगारांना धनंजय मुंडेंचा राजाश्रय असल्याचा आरोप सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी केले. दुसरीकडं अंजली दमानियांनीही धनंजय मुंडेंविरोधात मोहीम उघडली. या सगळ्या आरोपांमध्ये धनंजय मुंडेंची कोणीही पाठराखण करताना दिसत नाही. वाल्मिक कराडांचा आका कोण असा जाहीर प्रश्न सुरेश धस विचारु लागले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपांचा सामना करणाऱ्या धनंजय मुंडेंनी संतोष देशमुख प्रकरणात आपली भूमिका मांडली. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात ज्याचं नाव येईल त्याला फाशी द्या अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे.

ज्या वाल्मिक कराडवरुन आरोप होत आहेत तो वाल्मीक कराड सुरेश धस यांचाही निकटवर्तीय असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळू नये, पालकमंत्रीपद मिळू नये असा काही जणांचा डाव होता. त्यातूनच आरोपांची मीडिया ट्रायल सुरु असल्याचा पलटवारही धनंजय मुंडेंनी केला आहे.

धनंजय मुंडेंमुळं बीडचा बिहार झाल्याचा आरोप झाला आहे. आरोप करणाऱ्यांमध्ये महायुतीतले नेतेही असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वाल्मीक कराडवरुन सुरु असलेल्या आरोपांमुळं महायुतीत धनंजय मुंडे एकाकी पडलेत का असा प्रश्न निर्माण झालंय.