उर्वशी खोना, उमेश परब (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग : मालवण किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा पुतळा उभारणीचं काम सुरू झालंय. याच वर्षी ऑगस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यातून धडा घेऊन आता 100 वर्ष टिकेल असा मजबूत पुतळा उभारणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्ट महिन्यात वादळात कोसळला. यामुळे लाखो मराठी बांधवांच्या काळजावर घाव बसले. पुतळ्याच्या दर्जावरुन शिल्पकार आणि सरकारवर सडकून टीका झाली. मात्र आता याच रोजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या मजबूत, रुबाबदार आणि 60 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जाणारा जाणार आहे. राज्य सरकारनं नुकतीच त्याची घोषणा केली. या पुतळ्याचा पाया उभारण्यासाठी खोदकामालाही सुरुवात झालीय. मात्र सध्या खोदकामादरम्यान कठीण खडक लागताहेत. त्यामुळं कामाचा वेग मंदावलाय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य पुतळयाचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन्स या कंपनीला देण्यात आलंय. हा पुतळा फेब्रुवारीपर्यंत पुर्ण होईल असा अंदाज राम आणि अनिल सुतार यांनी वर्तवलाय.
हेही वाचा : 31 डिसेंबरला मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार; पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार
रोजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा 60 फूट उंचीचा भव्य पुतळा 100 कामगार उभारणार आहेत. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला IIT कडून हिरवा कंदील मिळाला असून IIT कडून राजकोट किल्ल्यावरील हवेचा दाब, हवेच्या दिशेचा अभ्यासशिवरायांच्या पुतळ्यासाठी ड्युप्लेक्स स्टीलचा वापर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या निर्मितीत वापरेल्या धातूचा वापर करण्यात येणार आहे. सोमवारपासून पुतळ्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तेव्हा मागच्या दुर्घटनेतून धडा घेऊन यावेळी शिवरायांचं भक्कम शिल्प उभारलं जाईल, जेणेकरुन महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्याच्या अभिमानात ते भर घालेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.