Mahadev Munde Murder Case: महादेव मुंडे हत्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. पोलिसांनीच महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास दडपल्याचा आरोप केलाय. ज्या दिवशी महादेव मुंडेंची हत्या झाली त्या दिवशी काही पोलिस अधिकाऱ्यांना तब्बल दीडशे फोन केल्याचा दावा धस यांनी केलाय. महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांनीही या हत्येचा तपासही सीआयडीकडं देण्याची मागणी केलीय.
परळीच्या महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात तपास करणारे पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिलेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास गेल्या सव्वा वर्षांत का झाला नाही असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. महादेव मुंडे यांचा खून झाला त्या काळात वाल्मीक कराड याची मुलं श्री आणि सुशील कराड यांनी पोलीस अधिकारी रवींद्र सानप याच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतत तब्बल दीडशे वेळा फोन केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय.
काही पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासल्यावर महादेव मुंडेंचा खून कुणी केला हे आपोआप समोर येईल असा दावा सुरेश धस यांनी केलाय.
सुरेश धस यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन महादेव मुंडेंच्या हत्येच्या फाईलवरील धुळ झटकून तपास करण्याची मागणी केलीय. सुरेश धस यांनी मागणी केल्यानंतर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेही पुढं आल्यात. त्यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीनं करावा अशी मागणी केलीय.
परळीतल्या सरकारी कार्यालयांसमोर महादेव मुंडेंची हत्या होते. पोलीस महादेव मुंड़ेंच्या हत्येची फाईल दाबून टाकतात. दीड वर्ष कोणताही तपास होत नाही. महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांना ज्यांच्यावर संशय आहे ते पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात. ही परिस्थिती बीडचा बिहार झालाय हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. आता तरी महादेव मुंडेंचे मारेकरी पोलीस पकडणार का हे पाहावं लागणार आहे.