साधारण अडीच वर्षांपूर्वी शिवसेना फुटली. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला. या मागची नेमकी कारणं त्यावेळी पक्ष सोडून गेलेल्यांनी, तसंच पक्षप्रमुखांनी, पक्षाध्यक्षांनीही सांगितली आहेत.. तर राजकीय तज्ज्ञांनीही याबद्दल आपली मतं नोंदवली आहेत. कोल्हापुरात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पक्षफुटीबाबतची कारणं सांगितली आहेत. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे, पाहुयात सविस्तर
गमतीजमतीत उद्धव ठाकरेंवर निशाणा
वरकरणी पाहता सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया त्या म्हणतात, तशी गमतीजमतीची वाटेल. पण थोडं नीट पाहिल्यास सुप्रियाताईंना नेमकं जे बोलायचं होतं तेच त्या सहज बोलून गेल्या आहेत, असंच दिसतंय. कोल्हापुरातल्या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेतेमंडळी जमली होती. खुद्द शरद पवारही यावेळी व्यासपीठावर होते. साधारण अडीच वर्षांपूर्वी पहिल्यांदा शिवसेना फुटली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला. तेव्हा अनेक स्तरातून विविधांगी प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.
त्यावेळी पक्षफुटीमागे दिल्लीची अदृश्य शक्ती आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली होती. मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असताना, पुन्हा सुप्रिया सुळेंनी पक्षफुटीवर भाष्य का बरं केलं असावं? हा प्रश्न उरतोच. बरं नुसतं बोलल्या असत्या तर ठीक पण त्यांनी आपल्या गमतीशीर विधानाआडून उद्धव ठाकरेंवर नाव न घेता नेम धरला.
धर्मवीर-2 चित्रपटात एक प्रसंग
काही दिवसांपूर्वी आलेल्या धर्मवीर-२ चित्रपटात एक प्रसंग आहे. संजय शिरसाट यांचं पात्र ठाकरेंच्या खोलीबाहेर त्यांची वाट पाहत असतं. त्यावेळी शिरसाटांच्या पात्राच्या तोंडी एक डायलॉग आहे. त्यात ते पात्र म्हणतं, कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं हे शरद पवार साहेबांकडून शिकलं पाहिजे. तो प्रसंग तिथंच संपतो. मात्र त्याच भावना आता अप्रत्यक्षपणे सुप्रियाताईंनी बोलून दाखवल्याची चर्चा आहे.
कुठलंही विधान करताना अतिशय सजग राहणा-या सुप्रियाताईंच्या आजच्या या विधानामुळे साहजिकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वेदना होतील. या विधानावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तसंच सुप्रियाताई आपल्या या विधानावर काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.