पोलीस अटक करण्यासाठी आले असता वॉण्टेड आरोपीने दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील काशिमिरा येथे ही घटना घडली आहे. पोलीस अटक करण्यासाठी पोहोचल्यानंतर आरोपीने जीव धोक्यात घालत दहाव्या मजल्यावरुन खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिथे एक गोंधळ उडाला होता. पण अखेर पोलिसांनी त्याची समजूत काढून पुन्हा घरात जाण्यास मनवलं. यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हैदराबाद येथे एनडीपीएसच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी हैद्राबाद पोलीस पोहोचले होते. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने इमारतीच्या दहाव्या मजल्याच्या बाल्कनीतुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बाल्कनीतून पळताना अडकल्यानंतर पोलिसांनी व अग्निशमन विभागाने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर त्याचं मनपरिवर्तन करत दरवाजा तोडत प्राण वाचवले. तेथील रहिवाशांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार रेकॉर्ड केला. यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पोलीस येताच वॉण्टेड आरोपीचा 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न, मिरा रोडमधील घटना pic.twitter.com/CVPo6cGqnL
— Shivraj Yadav | शिवराज यादव (@shiva_shivraj) December 2, 2024
वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी हैदराबाद पोलिसांच्या एनडीपीएस केसमधील फरार आरोपी आहे. त्याला पकडण्यासाठी हैदराबाद पोलीस आले असता स्थानिक पोलिसांची मदत मागण्यात आली होती. पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. पोलीस आल्याचं समजताच अटक होऊ नये यासाठी दहाव्या माळ्यावरुन धोका पत्करुन खाली उतरत होता. यावेळी पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत मतपरिवर्तन केलं आणि पुन्हा फ्लॅटमध्ये जाण्यास तयार केलं. पण आतमध्ये गेल्यानतंर तो दरवाजा उघडत नव्हता. यानंतर आम्ही दरवाजा तोडून त्याला बेड्या ठोकल्या असं पोलिसांनी सांगितलं आहे".