Wakf Board Wakf Board Vs Sanatan Board : महाराष्ट्रात वक्फ बोर्ड विरुद्ध सनातन बोर्ड असा नवा वाद निर्माण होऊ पाहतोय. महायुती सरकारमधील मस्त्य व बंदरविकास मंत्री नितेश राणेंनी वक्फबोर्डाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशात आणि राज्यात जसा मुस्लिम समाजाचा वक्फबोर्ड आहे तसाच देशात सनातन बोर्ड स्थापन होणार असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे. सनातन बोर्डात सर्व हिंदू असतील असंही राणे म्हणाले आहेत. त्यासाठी काही संघटना विचार करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
2047 साली हिंदू राष्ट्राचं मुस्लिम राष्ट्र करण्याचा डाव सुरू असल्याचा आऱोपही राणेंनी केला आहे. त्याविरोधात कडवट भूमिका घेण्याची गरज असल्याचंही राणेंनी सांगितलंय. नितेश राणेंनी सनातन बोर्ड स्थापन करण्याचे संकेत दिल्यानंतर आता काँग्रेसनं त्यावर प्रतिक्रिया दिलीय. भाजपकडून हिंदू-मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.
राज्यातील काही जमिनींवर वक्फ बोर्डाकडून दावा करण्यात येतोय.. मात्र राज्यातील कोणतीही जागा वक्फबोर्डाला देणार नसल्याची रोखठोक भूमिका नितेश राणेंनी घेतलीय...त्यामुळे पुढील काळात वक्फबोर्ड विरुद्ध सनातन बोर्ड असा वाद रंगण्याची चिन्ह आहे.
लातूरच्या तळेगावातील 103 शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला होता. या संदर्भातली नोटीसच शेतकऱ्यांना बजावण्यात आली. या प्रकरणी न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडं केली होती. याबाबत एक्सवर पोस्ट करत राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका मांडली होती. गेली कित्येक वर्ष वक्फ बोर्ड मनमानी कारभार करतंय. त्याला चाप कसा बसवणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असल्याचं राज ठाकरेंनी म्हंटल होते.