धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?

धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं मानलं जात आहे.

वनिता कांबळे | Updated: Feb 8, 2025, 06:56 PM IST
धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला? title=

Ajit Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबतचा निर्णय आता फडणवीसांच्या कोर्टात होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. अंजली दमानियांनी मुंडेंवर केलेल्या आरोपाची, पुराव्याची जी माहिती मला दिली तिच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचंही अजित पवार म्हणालेत. त्यामुळे आता मुंडेंबाबत काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी फडणवीसांना सांगितलंय. इतकंच नाही तर 'आरोपांमध्ये तथ्य असेल तर चौकशी होईल, मुख्यमंत्री तसे आदेश देऊ शकतात असंही अजित पवारांनी म्हटलंय.

हे देखील वाचा... फेरीवाल्यांकडे डोमिसाईल असेल तरच महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करता येणार; मराठी माणसांना रोजगाराची सुवर्ण संधी 

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या निर्णयाचा फुटबॉल झाल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील असं काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर अंजली दमानियांनी कृषी विभागात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे आरोप केले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी चोहोबाजूंनी दबाव आलेला असताना अजित पवारांनी आता पुन्हा वेगळी भूमिका घेतलीय. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेतील असं सांगत दादांनी फडणवीसांकडं चेंडू टोलावलाय.

अजित पवारांनी फडणवीसांच्या कोर्टात चेंडू टोलावल्यानंतर फडणवीसांनी या प्रकरणी कानावर हात ठेवलेत. अजित पवार काय बोललेत हे मी त्यांना विचारीन नंतरच त्यावर बोलेन असं फडणवीसांनी सांगितलंय. पण मुंडेंच्या राजीनाम्याबाबत त्यांनी कोणतंही उत्तर देणं टाळलंय.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मात्र वेगळी भूमिका घेतलीय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला अजित पवारच करतील असं सुनील तटकरे म्हणालेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी महायुतीतून दबाव वाढतोय. विरोधकही तीच मागणी करतायेत. अंजली दमानिया तर राजीनाम्यास कारण म्हणून रोज एक प्रकरण बाहेर काढतायेत. अशावेळी राजीनाम्याचा निर्णय घेण्याऐवजी तो विषय टाळण्याकडंच महायुतीच्या नेत्यांचा कल दिसू लागला आहे.