Delhi Election Results 2025: दिल्लीत आपचा सुपडासाफ झाला. मात्र त्याचवेळी काँग्रेसने पराभवाची हॅटट्रिक केलीये. यंदाही काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसच्या पराभवावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलीच टीका केलीय. दिल्लीत काँग्रेस आणि आप स्वतंत्र लढल्यामुळं पराभव झाल्याचं विश्लेषण आता केलं जातंय.
दिल्ली विधानसभेत काँग्रेसच्या हाती भोपळा
दिल्ली विधानसभेत काँग्रेसचा मानहानिकारक पराभव झालाय. काँग्रेसला 70 जागांपैकी एकही जागा जिंकता आली नाही. ही तिच दिल्ली आहे ज्या दिल्लीत एकेकाळी काँग्रेसचा पंजाच चालत होता. काँग्रेस नेत्या शीला दीक्षितांसारख्या महिला मुख्यमंत्र्यांचा कारभार दिल्लीकरांनी पाहिला. आज त्याच काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत खातंही उघडता आलं नाही. काँग्रेस नेत्यांनी दिल्लीसाठी बऱ्याच जोरबैठका काढल्या होत्या पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दिल्लीच्या रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या हाती पराभवाशिवाय काहीच लागलं नाही.
काँग्रेसच्या पराभवावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शालजोडीतले लगावलेत. दिल्लीत देशातील सर्वात जुन्या पक्षाचा मानहानीकारक पराभव झालाय. काँग्रेस नेते मात्र हा लाजीरवाणा पराभव घेऊन मिरवू लागल्याचं मोदी म्हणालेत.
दारुण पराभवानंतर काँग्रेस आत्मचिंतन करणार का?
दिल्लीत काँग्रेस आणि आप स्वतंत्र लढल्यामुळं पराभव झाल्याचं विश्लेषण इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलंय. दिल्लीत काँग्रेस आणि आपची आघाडी झाली असती तर मतविभाजन टळलं असतं. शिवाय भाजपला तगडी टक्करही देता आली असती असंही तज्ज्ञांना वाटतं.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मित्रपक्षांसोबत इंडिया आघाडीच्या स्वरुपात लढली. त्यामुळं त्यांना सन्मानजनक जागा जिंकता आल्या. कोणत्याही निवडणुकीत एकटं लढल्यास पानीपत निश्चित आहे हे काँग्रेसला कळून चुकलंय. त्यामुळं आगामी काळात काँग्रेस निवडणूक लढताना वेगळी रणनिती अवलंबेल अशी आशा व्यक्त केली जातेय.