रत्नागिरी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीला लिहिलेल्या पत्रावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चांगलेच संतापले. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंत्र्यांना नको तिथे लुडबूड करण्यापासून रोखा असं सांगितलं. यानंतर आता या वादावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांशी बोलून त्यांचा गैरसमज दूर करू. माझं मत युजीसीकडे मांडणं हा गुन्हा आहे, असं मला वाटत नाही, असं उदय सामंत म्हणालले आहेत.
'विद्यार्थ्यांच्या मनातलं मी पत्रामध्ये लिहिलं आहे. युजीसीला लिहिलेलं पत्र हे माझं मत आहे. राज्यातली कोरोनाची परिस्थिती बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करूनच पत्र लिहिलं. कोव्हिडची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची मानसिकता मी याबाबतचं माझं मत मी पत्रात मांडलं,' असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं.
राज्यपालांना विश्वासात न घेता काहीही केलेलं नाही. मागच्या परीक्षा रद्द झाल्या तेव्हाही राज्यपालांशी चर्चा केली होती, असं उदय सामंत यांनी सांगितलं. तसंच कोणताही निर्णय घेत असताना विद्यार्थ्याचं शैक्षणिक आणि भविष्यात नोकरी किंवा व्यवसायासाठी नुकसान होऊ नये, हे पाहूनचं निर्णय घेतला जाईल, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीला पत्र लिहून राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी भूमिका मांडली होती. मात्र राज्याचे राज्यपाल आणि सर्व विद्यापीठाचे कुलपती या नात्याने भगतसिंग कोश्यारी या भूमिकेवर चांगलेच भडकले.
उदय सामंत यांनी या प्रकरणात लुडबूड करू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी त्यांना द्याव्येत, अशी खरमरीत सूचना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. त्यांची ही लुडबूड युजीसीच्या नियमांचं उल्लंघन करणारी आहेच, त्याचबरोबर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६च्या तरतुदींचं उल्लंघन करणारीही आहे, असं कोश्यारी म्हणाले आहेत.