प्रताप नाईक, कोल्हापूर : महायुतीत खातेवाटपावरुन प्रचंड रस्सीखेच होती. त्यामुळंच सरकार स्थापन होऊनही महिना दीड महिना खातेवाटप होऊ शकलं नाही. जवळपास 41 मंत्री बिनखात्याचे होते. खातेवाटपाचा तिढा सुटलेला असतानाच आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा महायुतीत कळीचा झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप कार्यकर्ते यावेळी पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचं खासगीत सांगतायेत. दुसरीकडं अजितदादांचे खंदे समर्थक दत्ता भरणे यांनी मात्र पालकमंत्रिपद अजितदादांनाच मिळेल असा दावा केलाय.
पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच आहे. तसेच मुंबईच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपत सुप्त संघर्ष आहे. तर बीडचं पालकमंत्रीपद मुंडे बंधू-भगिनींना देण्यास विरोध होत आहे. संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये शीतयुद्ध सुरु आहे, तर रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी-शिवसेनेत रस्सीखेच आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचं गिफ्ट नव्या वर्षात मिळेल असा आशावाद भरत गोगावलेंनी व्यक्त केलाय. तसेच रायगडचे वरिष्ठ आमदार म्हणून पालकमंत्रिपदावर आपलाच दावा असल्याचं गोगावले सांगत आहेत.
पालकमंत्रिपद मिळालं की जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या हातात येतात. आता तीन पक्षांमध्ये त्या त्या जिल्ह्यांमध्ये राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी स्पर्धा सुरु झालीय. तिनही पक्षांत आपापसात प्रचंड स्पर्धा असल्यानं पुढचे काही दिवस पालकमंत्रिपदं जाहीर होण्यासाठी उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.