राज्यात कुठे-कुठे एसटी सुरू झाली आणि किती कर्मचारी कामावर आले

तुमच्या जिल्ह्यात एसटी सुरू झाली की नाही? किती कर्मचारी कामावर आले पाहा सविस्तर

Updated: Nov 26, 2021, 09:29 PM IST
राज्यात कुठे-कुठे एसटी सुरू झाली आणि किती कर्मचारी कामावर आले title=

मुंबई: राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. 41 टक्के पगारवाढ देण्याची घोषणा केल्यानंतरही अनेक कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहे. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसात कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर काही ठिकाणी एसटी कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे आता नागरिकांना काहीसा दिलासाही मिळाला आहे. 

राज्यातील 11 हजार 549 एस टी कर्मचारी आज कामावर हजर झाले. एसटी महामंडळाच्या हजेरी पटावर एकूण कर्मचारी संख्या 92 हजार 266 इतकी आहे. चालक, वाहक, कार्यशाळा आणि प्रशासकीय विभागातील एकूण 11 हजार 549 कर्मचारी कामावर हजर होते. एस टी महामंडळानं ही माहिती दिली. 

वसईत पहिली एसटी बस धावली. एकूण पाच बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या. वसई स्टेशन ते वसई गाव या मार्गावर एसटीची सेवा सुरु करण्यात आली. शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. 

विरार आणि नालासोपारा आगारातून एकही एसटी बस रवाना करण्यात आलेली नाही. वसई आगारात 262  कर्मचा-यांपैकी 32 कर्मचारी सेवेवर हजर झाले. राज्य सरकारच्या आवाहनानंतर यवतमाळ विभागातील 219 कर्मचारी कामावर रुजू झालेत. 

कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी कोणीही चालक आणि वाहक नसल्यानं एसची सेवा ठप्प आहे. दरम्यान जिल्ह्यातील 105 संपकरी एसटी कर्मचारी निलंबित करण्यात आले असून 118 कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.

सोलापुरात अजूनही एसटी कर्मचारी आंदोलन सुरूच आहे. त्यामुळं एसटी डेपोतून फक्त दोन बसेस धावल्या. सोलापूर मोहोळ मार्गावर या दोन एसटी रवाना झाल्या. सोलापूरात निलंबित झालेले एसटीचे वाहक आणि चालक कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती मिळत आहे. 

एसटी कर्मचा-यांचा आडमुठेपणा कायम राहिल्यास पगारवाढीच्या निर्णयाबद्दल फेरविचार करणार असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे. उद्यापर्यंत कर्मचारी कामावर आल्यास परवानगी, अन्यथा कठोर कारवाई करणार असंही सांगितलं आहे. इतर संपकरी एसटी कर्मचारी अजून कामावर रुजू झालेले नाहीत. दुसरीकडे एसटी बसला प्रवाशांनी अल्प प्रतिसाद दिला. पगारवाढ दिल्यानंतरही संप सुरू ठेवल्यास पगारवाढीचा 

पुनर्विचार करावा लागेल अशी आक्रमक भूमिका आता परिवहनमंत्री अनिल परब यांनी घेतली.  संप सुरू असताना आता वाटाघाटी होणार नसल्याचं परबांनी स्पष्ट केलं. पैसे देऊनही संप सुरू ठेवत असतील तर मग पैसे न देताच संप सुरू राहिल्यास काय वाईट? असा सवाल अनिल परबांनी कर्मचा-यांना केला. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी 17 कामगार संघटनांच्या कृती समितीसोबत चर्चा केली.