महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. आज या परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेला मुंबई, कोकण, पुणे, नाशिकह राज्यभरातील आठ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा 17 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.
शालेय जीवनात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दहावी परीक्षेसाठी नवी मुंबईतील शाळा सज्ज झाल्या असून शहरात 40 ठिकाणी परीक्षा केंद्र असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिरषदेच्या शिक्षण विभागाने दिली. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, याची सर्वपरी काळजी घेण्यात आली आहे. शिवाय कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने 6 भरारी पथके नेमली आहेत. तालुका तसेच प्रत्येक महापालिका स्तरावर प्रत्येकी दोन बैठे पथकाची नियुक्ती केली आहे.
ठाणे जिल्ह्यात यंदा 1 लाख 21 हजार 244 विद्यार्थी 338 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. तसेच 6 भरारी पथके कॉपीमुक्त परीक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. यापैकी ग्रामीण भागात ६० तर महापालिका क्षेत्रात 278 परीक्षा केंद्र असणार असून, यातील पालिका क्षेत्रात ४० केंद्र आहेत. परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. त्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी शिक्षण मंडळाने यापूर्वीच 10 समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे.
रात्रशाळांमधील सुमारे 4 हजार विद्यार्थी यंदा दहावीची परीक्षा देणार आहेत. या रात्रशाळांतील विद्यार्थी अत्यंत कठीण परिस्थितीतही 'अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत आमुची आशा' या उक्तीप्रमाणे परीक्षेची तयारी करत आहेत. राज्यभरात या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 9 हजारांवर पोहोचली आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर जिल्हानिहाय प्रत्येकी दोन या प्रमाणे समुदेशकांची नियुक्ती केली आहे.
कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करणारे, त्यासाठी मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे.
शिवाय परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार असून संबंधित केंद्राच्या परिसरात 163 कलम लागू राहणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी नेमण्यात आलेले विशेष पथक केंद्राच्या परिसरात लक्ष ठेवणार आहेत.