Maharashtra Weather News : उन्हामुळं सर्वत्र रखरखाट, समुद्रावरून वाहू लागले उष्ण वारे; आठवडाअखेरीस हवामानानं वाढवली चिंता

Maharashtra Weather News : राज्यात सूर्याचं कोपणं सुरु असतानाच आता किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण, मध्येच उष्ण वाऱ्यांनी वाढवली अडचण. पाहा हवामान वृत्त...

सायली पाटील | Updated: Feb 21, 2025, 06:47 AM IST
Maharashtra Weather News : उन्हामुळं सर्वत्र रखरखाट, समुद्रावरून वाहू लागले उष्ण वारे; आठवडाअखेरीस हवामानानं वाढवली चिंता
Maharashtra Weather News Temperature reaches at Maximum point Mumbai Forecast climate update

Maharashtra Weather News : महाराष्ट्रासह देशभरातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत असून, हवामानात होणाऱ्या या बदलांचा आता ऋतूचक्रावरही थेट परिणाम होताना दिसत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेकडे पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं पुन्हा एकदा तापमानात घट झाली असून, काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य भारतामध्ये कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून, दक्षिण भारतातही हेच चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास राज्यात सध्या उष्णतेचं सत्र सुरू झालं असून, त्यामुळं बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, किमान आणि कमाल तापमानामध्ये बराच फरकही पाहायला मिळत आहे. राज्याच्या विदर्भ क्षेत्रामध्ये उष्णा दर दिवसागणिक वाढत असून, सोलापुरातही चित्र वेगळं नाही.

प्राथमिक माहितीनुसार सध्या राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूरमध्ये करण्यात आली असून, इथं पारा 38 अंशांवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. काही भागांमध्ये दिवसा घाम फोडणारा उकाडा असतानाच रात्री आणि पहाटेच्या समयी मात्र हवेत गारठाही जाणवत आहे. मुंबईसुद्धा या उष्म्याला अपवाद नाही. शहरात सध्या तापमानाचा आकडा 36 अंशांवर असला तरीही त्याचा दाह मात्र 38 अंश सेल्सिअसइतका जाणवू लागल्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत.

कोकण किनारपट्टी क्षेत्रासह राज्यातील सागरी किनारपट्टी भागामध्ये दमट वातावरणात वाढ झाली आहे. समुद्राच्या पृष्ठावरून वाहणारे उष्ण वारे आता उन्हाळा आणखी तीव्र होणार याचीच जाणीव करून देत आहेत. परिणामी मुंबई, ठाणे, पालघरसह रत्नागिरी आणि बहुतांश कोकणालाही उन्हाचा तडाखा बसतना दिसत आहे.

हेसुद्धा वाचा : 'वारंवार बसत असलेल्या धक्क्यांमुळे मी आता...', निष्ठावंत सोडून जात असताना उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण पुढील 24 तासांमध्ये पाहायला मिळू शकतं. त्यामुळं आठवड्याच्य शेवट उकाड्यानंच होणार असून, ढगाळ वातावरणामुळं वातावणाची कोंडी होणार असून, त्यमुळं उष्मा आणखी जाणवू शकतो असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.

राज्यातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये

सोलापूर – 38 अंश सेल्सिअस

अकोला – 36.8 अंश सेल्सिअस

चंद्रपूर – 36.8 अंश सेल्सिअस

सांताक्रूझ- 35 अंश सेल्सिअस

रत्नागिरी- 34.3 अंश सेल्सिअ