मुंबई : बीडमधल्या पूजा चव्हाण या टिकटॉक स्टार तरुणीच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय. याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांनी आरोप केले आहेत. पूजा चव्हाण मृत्युप्रकरणानंतर आठ दिवसांनी पूजाच्या वडिलांनी मीडियाला प्रतिक्रीया दिली. यानंतर राजकीय वर्तुळातूनही आता प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.
पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणाचं राजकारण करणं चुकीचं असून, महाराष्ट्र नेहमीच स्त्रीयांच्या आणि न्यायाच्या बाजूनं उभा राहतो असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
पूजा चव्हाण नावाच्या टिक टॉक स्टार तरुणीच्या मृत्यूनंतर आता तिचे कुटुंबीय आणि नातेवाईक पहिल्यांदाच मीडियासमोर आले. आमच्या मुलीची बदनामी थांबवा, अशी कळकळीची विनंती पूजाच्या वडिलांनी केलीय. तर कथित ऑडिओ क्लिपमधला आवाज अरुण राठोडचा नाही, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मृत्यूनंतर आठवडाभरानंतर पूजाचे वडील पहिल्यांदाच समोर आले. पोल्ट्री व्यवसायातील नुकसानीमुळं पूजानं आत्महत्या केली असावी, असं ते सांगत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या क्लिपमधला आवाज पूजाचा नाही, असा दावाही त्यांनी केलाय.
पूजाच्या मृत्यूनंतर तब्बल 11 ऑडिओ क्लिप्स समोर आल्या. त्यात अरुण राठोड नावाच्या पूजाच्या मित्राचाही आवाज असल्याचं समोर आलं होतं. मात्र तो आवाज अरुण राठोडचा नाही, असा दावा अरुणच्या कुटुंबीयांनी देखील केला आहे.