Shiv Sena Operation Tiger : शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या गळाला राज्यातील कोणते नेते लागणार याची उत्सुकता होती. शिवसेनेने कोकणातून या ऑपरेशनला सुरूवात केल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. भाजपला चकवा, ठाकरेंना धक्का देत राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर चर्चेबबात खुलासा केला आहे.
दिल्लीत मोठ्या घडामोडी सुरु आहेत. ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी शिंदेंचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भोजनासाठी उपस्थिती लावली. यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरु असल्याची चर्चा रंगली यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांचे काम ठाकरे गटाच्या नेत्यांना पटत आहे यामुळेच मोठ्या संख्येने लोक शिवसनेत येत आहेत. यामुळे ऑपरेशन टायगर वैगरे अस काही म्हणता येणार नाही. ऑपरेशन टायगर असं काही नाव नाही असा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे.
राजन साळवी पक्षाची ताकद वाढवणार. राजन साळवी यांच्याशी मनोमिलन होण्याचा विषयच नाही. राजन साळवी आणि आमचे चांगले संबध आहेत. एकत्र बसून विचार करुन चर्चा करुनच राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी यांच्यावर एकनाथ शिंदे जी संघटनेची जबाबदारी देतील ते आम्हाला मान्य असेल. राजन साळवी यांनी कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता शिवसनेत प्रवेश करणाऱ्या राजन साळवी यांना एकनाथ शिंदे वाऱ्यावर सोडणार नाहीत. राजन साळवी यांना एकनाथ शिंदे शिवसेनेत योग्य मान सन्मान देतील असेही उदय सामंत म्हणाले. येत्या काळात ठाकरे गटातील आणखी काही नेते शिंदे गटात येतील असंही उदय सामंत यांनी सांगितले.