'शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स', राऊतांचा टोला! म्हणाले, 'फडणवीस रोज...'

Sanjay Raut On Eknath Shinde Shivsena Operation Tiger: ठाकरेंच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाण्याची चर्चा सुरु असतानाच राऊत काय म्हणालेत जाणून घ्या.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 7, 2025, 10:49 AM IST
'शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स', राऊतांचा टोला! म्हणाले, 'फडणवीस रोज...' title=
राऊतांनी साधला शिंदेंवर निशाणा

Sanjay Raut On Eknath Shinde Shivsena Operation Tiger: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा अपेंडिक्स असा उल्लेख करत टोला लगावला आहे. 'ऑपरेशन टायगर'संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊतांनी हा टोला लगावला. तसेच एवढ्यावर न थांबता त्यांनी शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला हा अपेंडिक्स कधीही काढून टाकला जाऊ शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला. अमेरिकेने भारतीयांना डिपोर्ट करताना दिलेली वागणूक, धनंजय मुंडे प्रकरण, लाडकी बहीण योजनेतून वगळलेली नावं अशा अनेक विषयांवरुन राऊतांनी सरकारला लक्ष्य केलं.

भारताचा तमाशा जगाने पाहिला

अमेरिकेने भारतीयांना जी वागणूक दिली आहे त्याचे पडसाद काल संसदेत उमटले, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. अल कायदाचे अतेरिकी आहेत अशी वागणूक अमेरिकेने भारतीयां दिली, अशा शब्दांमध्ये त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. अमेरिकेने भारतीय कायदा मोडल्याचा आरोप राऊतांनी केला. "हातात आणि पायात बेड्या घालून त्यांना आणलं. भारताच्या हद्दीत आणल्यावर त्यांना बेड्या घातल्या होत्या. अमेरिकेने भारतीय कायदा मोडला," असं राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "जगाला अमेरिकेने दाखवलं की भारताची काय किंमत आहे. घुसखोरीच कोणीच समर्थन करणार नाही, पण माणुसकी नावाची गोष्ट असते. भारतीयांना नोटीस, समन्स बजावलं असतं तर बरं झालं असतं. बाकी देशांनी आपली आपली विमानं अमेरिकेत पाठवली होती. भारताचा तमाशा जगाने पाहिला," असा टोला राऊतांनी लगावला.

पुढे बोलताना, "परराष्ट्रमंत्री एस जयशंकर काल अमेरिकेची वकिली राज्यसभेत करत होते. पंतप्रधान मोदी आता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटायला चालले आहेत. त्या भेटीत मोदी हा मुद्दा उपस्थित करणार आहेत का हे आम्ही काल त्यांना विचारलं. अमेरिकी लष्कराचं विमान भारतात दाखल झाल्यानंतरही भारतीयांच्या बेड्या काढल्या नाही हे भारतीय कायद्याचं उल्लंघन आहे. अमेरिकेने भारताचा कायदा हाती घेतला आहे," असं राऊत म्हणाले.

फडणवीस रोज...

उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार असून हे 'ऑपरेशन टायगर' उद्योगमंत्री उदय सामंत हाताळत असल्याच्या बातम्या समोर आल्या. यावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी, "ऑपरेशन टायगर, ऑपरेशन कमळ होईल पण ऑलरेडी ऑपरेशन रेडा झाला आहे," असा टोला लगावला. पुढे बोलताना, "ते चुकीचा आकडा सांगत आहेत. त्यांनी सगळाच आकडा घेतला पाहिजे," असा चिमटाही त्यांनी काढला. "काल आम्ही सगळे पक्षाचे खासदार सोबत होतो. राहुल गांधी दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या याद्या बाबत पुरावे देणार आहेत. फडणवीस रोज त्यांचं ऑपरेशन करत आहेत. शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाऊ शकतो. त्यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे," असा टोला राऊतांनी लगावला. 

धनंजय मुंडेंवरुनही टोला

धनंजय मुंडेंवर प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी, "याच उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दिलं पाहिजे असं म्हटलं. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग यांनी यावर बोलावं," अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. घरगुती हिंसाचार प्रकरणा धनंजय मुंडेंना दोषी ठरवत त्यांना पत्नी करुणा शर्मांना पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले असून त्याच पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते. 

लाडकी बहीणवरुन हल्लाबोल

लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना संजय राऊतांनी, "सरकारी तिजोरीत पैसे नाहीत त्यामुळे आता अनेक महिला वगळल्या जातील. ही सुरुवात आहे," असं म्हटलं. 

मकोकावरुनही निशाणा

उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मकोका कायदा लावा या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेसंदर्भात बोलताना राऊतांनी, "महाराष्ट्राच्या निवडणुकीत अनेक उद्योगपतींकडून खंडण्या गोळा केल्या. धमक्या देऊन ते गोळा केले गेले. फडणवीस यांनी याची कठोर अंमलबजावणी केली," असं म्हणाले. पुढे बोलताना, "मकोका लावावा याचं मी स्वागत करतो," असं राऊत म्हणाले.