महाराष्ट्रात खरेदी-विक्री सोपी नाही, जितेंद्र आव्हाडांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची भाजपावर टीका

Updated: Nov 10, 2019, 04:43 PM IST
महाराष्ट्रात खरेदी-विक्री सोपी नाही, जितेंद्र आव्हाडांचा टोला title=

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. पण सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारे १४५ चे संख्याबळ भाजपाकडे नाही. त्यामुळे भाजपाला शिवसेनेची साथ घ्यावी लागणार आहे. पण समान पद आणि जागावाटपावर शिवसेना अडून आहे. त्यामुळे भाजपाची गोची झाली आहे. या पार्श्वभुमीवर घोडेबाजाराला वेग येण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर टीका केली आहे. 

भाजप कोणताही गट फोडू शकत नाही. हा महाराष्ट्र आहे कर्नाटक नाही असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. महाराष्ट्रात अजून एवढी खरेदी विक्री सोपी नसल्याचा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या भाजपाला राज्यपालांनी सरकार बनविण्याचे आमंत्रण दिले. 

शिवसेनाशिवाय १०५ आमदारांसोबत असलेल्या भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी करण्यासाठी १४५ चा आकडा पार करावा लागणार आहे. अशावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकते आणि काँग्रेस त्यांना बाहेरुन पाठींबा देईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी अजून ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचेही ते म्हणाले.