महाराष्ट्रात 18020 कोटींचा मेगा प्रोजेक्ट; नाशिक ते पालघर 4 तासांचा प्रवास फक्त एका तासात

नाशिक ते पालघर 4 तासांचा प्रवास फक्त एका तासात पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रात 18020 कोटींचा मेगा प्रोजेक्ट उभारला जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 9, 2025, 08:10 PM IST
महाराष्ट्रात 18020 कोटींचा मेगा प्रोजेक्ट;  नाशिक ते पालघर 4 तासांचा प्रवास फक्त एका तासात title=

Nashik Palghar Highway Project : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) आणि मुंबई-दिल्ली महामार्ग हे महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्वाचे प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. अशातच या महामार्गालगत  18020 कोटींचा  नाशिक पालघर महामार्ग उभारला जात आहे. या  मेगा प्रोजेक्टमुळे नाशिक ते पालघर 4 तासांचा प्रवास फक्त एका तासात पूर्ण होणार आहे. 

वाढवण बंदर आणि नाशिक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी हा महत्वाकांक्षी द्रुतगती महामार्ग बांधला जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मार्फत नाशिक ते पालघर असा  118 किमी लांबीचा महामार्ग बांधला जाणार आहे. हा महामार्ग मुंबई-सुरत समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. यानंतर चारोटी-इगतपुरी दरम्यान 85.38 किमी लांबीच्या मार्गापर्यंत पुढे जाणार आहे.

मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग आहे. 700 किलोमीपेक्षा मोठा असा हा महामार्ग मुंबई आणि नागपूरला जोडणारा आहे. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग 390 गावांमधून जाणार आहे. तर, दिल्ली-मुंबई महामार्गामुळे 24 तासांचा प्रवास 12 तासात पूर्ण होणार आहे. हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे आठ पदरीचा आहे. 

दिल्ली-मुंबई महामार्गावरच मुंबई - वडोदरा - जेएनपीटी बंदराला जोडणारा मार्ग आहे. समृद्धी महामर्गावर आमने येथून एका बाजूने वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे व दुसऱ्या बाजूने सध्याच्या नाशिक महामार्गासाठी एकूण सहा किमी लांबीचा जोडरस्ता बांधला जात आहे. आमने येथे समृद्धी महामार्ग संपल्यावर एक जोड रस्त्यावरुन वसई, विरार, डहाणू, सुरतमार्गे वडोदरा व तेथून हा महामार्ग मुंबई-दिल्ली महामार्गाला जोडला जाणार आहे.  

हे दोन्ही महामार्ग वाढवण बंदराला जोडले जाणार आहेत. या अंतर्गतच नाशिक जिल्ह्याला पालघरच्या वाढवण बंदराशी जोडण्यासाठी नवा महामार्ग बांधला जात आहे. पालघरमधील 33 तर नाशिकमधील 9 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. 
जव्हार आणि मोखाडा तसेच नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांमधून हा प्रस्तावित महामार्ग जाणार असल्यामुळे या क्षेत्रांमधील औद्योगिक, आणि आर्थिंक विकासाला चालना मिळणार आहे. या महामार्गामुळे स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला होईल मोठा फायदा होणार आहे.  

या द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पासाठी 18020 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे वाढवण बंदर आणि इगतपुरी यांच्यातील अंतर एका तासात पार होणार आहे. ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्वावर हा महामार्ग उभारण्याचे नियोजन आहे.