Ajit Pawar Gets Angry: पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय इमारतीच्या भुमीपूजनादरम्यान उपमुख्यममंत्री अजित पवार यांनी मंचावरुनच भाजपा आमदार महेश लांडगे यांनी चिमटे काढले. महेश लांडगे यांनी केलेलं एक विधान यासाठी कारणीभूत ठरलं. यानंतर अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या विकासात आपला किती महत्त्वाचा वाटा आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच बोलून दाखवलं. आपलं नाव न घेण्यावरुन नाराजी जाहीर करत त्यांनी सगळा इतिहासच सांगितला.
झालं असं की, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान महेश लांडगे यांनी केलं. यावेळी त्यांनी आपलं नाव न घेतल्याने अजित पवारांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. इतकंच नाही तर चांगल्याला चांगलं म्हणायला शिका अशा शब्दांत सुनावलं.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडलं. यावेळी भाषणादरम्यान महेश लांडगे यांनी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रयत्न केले, असं कौतुक केलं. दरम्यान जेव्हा अजित पवारांची भाषणाची वेळ आली तेव्हा त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विकासकामांच्या आणि उपक्रमांच्या उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पणाचा समारंभ संपन्न झाला. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन प्रशासकीय इमारत, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन आणि महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल व… pic.twitter.com/8LV0EbExyq
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 6, 2025
अजित पवार म्हणाले की, "महेशला माझं नाव घ्यायला काय वाईट वाटलं माहिती नाही. परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे. 1992 ला मी तुमचा खासदार झालो. 1992 ते 2017 पर्यंत कोणी पिंपरी चिंचवड सुधरवलं. 25 वर्षं झाली, प्रत्येक गोष्टीत मी लक्ष घालून काम करत असतो. अधिकाऱ्यांना विचारा कितीवेळा बसत असतो, चर्चा करत असतो आणि मार्ग काढत असतो. शेवटी आपण युतीमध्ये आहोत. ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका. इतका कंजूसपणा दाखवू नका. मी तरी दिलदार आहे. ज्याने केलं त्याला त्याचं क्रेडिट देत असतो".