Anganewadi Jatra 2025 : कोकणच्या (Konkan) भूमीची तुलना स्वर्गाशी केली जाते आणि त्यात काहीच अतिशयोक्ती नाही. अथांग समुद्रस विस्तीर्ण सागरी किनारा, उंचच उंत माडाची बनं अशा या कोकणातील रुढीपरंपरांनाही विशेष महत्त्वं मिळतं. याच कोकणातील आकर्षणाचा आणि अनेकांच्याच श्रद्धेचा विषय असणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा आता तोंडावर आली आहे.
अनेकांच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या भराडी देवीचा दरवर्षी पार पडणारा यात्रोत्सव यंदा 22 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडणार आहे. देवीला कौल दाखवून ही तारीख निर्धारित करण्यात आली. याच यात्रेला जाण्यासाठी आता अनेक मुंबईकर, चाकरमानी प्रयत्न करत असून, कोण सुट्ट्यांची जुळवाजुळव करतंय तर कोण कोकणात नेमकं कसं पोहोचायचं यासाठी थेट रेल्वेची मदत घेताना दिसतंय. अशा सर्व मंडळंसाठी कोकण रेल्वेनं पुढाकार घेत भाविकांसाठी खास व्यवस्था केली आहे.
दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी..
भराडी देवी ही आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबाची देवी आहे. मात्र या देवीच्या जत्रेसाठी सर्वांना प्रवेश असतो. शेतीचा एक हंगाम संपल्यानंतर आणि खरिपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ही जत्रा होते. दीड दिवस चालणाऱ्या भराडी देवीच्या जत्रेला दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख नागरिक सहभागी होतात.
प्रवाशांची वाढती गर्दी आणि आंगणेवाडीच्या दिशेनं जाणारा एकंदर ओघ पाहता या गर्दीचं विभाजन करण्यासाठी म्हणन कोकण रेल्वेकडून आगामी आंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतील. उपलब्ध माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतील.
कोकण रेल्वेच्या माहितीनुसार गाडी क्र. 01129 ही विशेष रेल्वेगाडी एलटीटीहून 21 फेब्रुवारी रोजी रात्री 12.55 वाजता सुटेल. सावंतवाडी रोड इथं ती दुपारी 12 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01130 विशेष रेल्वेगाडी सावंतवाडी रोडहून 21 फेब्रुवारी - रोजी सायंकाळी 6 वाजता सुटून मुंबई एलटीटीला सकाळी 6.10 वाजता पोहोचेल.
वरील रेल्वेगाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, बोरत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा असेल. तर, या रेल्वेगाडीला एकूण 19 डबे असतील.
गाडी क्र. 01131 एलटीटी येथून 22 फेब्रुवारी रोजी रात्री 12.55 वाजता सुटणार असून, ती सावंतवाडी रोडला दुपारी 12 वाजता पोहोचेल. गाडी क्र. 01132 ही सावंतवाडी रोडवरून 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सुटेल आणि एलटीटीला सकाळी 6.10 वाजता
पोहोचेल.
22 डब्यांची ही रेल्वे ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.
वरील रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट आरक्षणांची सुविधा सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्र आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यामुळं तारखा, वेळा आणि रेल्वे क्रमांक लक्षात ठेवून खुशाल तिकीटं काढा आणि आंगणेवाडीच्या यात्रेला जा!