Maharashtra Weather News Today on 20 FEB 2025 : महाराष्ट्रातील विदर्भ क्षेत्रामध्ये आता तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून, दुपारप्रमाणंच संध्याकाळपर्यंतही आता उष्मा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं उन्हाळा आता खऱ्या अर्थानं दाहक होण्यास सुरुवात झाल्याचच स्पष्ट होत आहे. राज्यात विदर्भाप्रमाणंच पश्चिम महाराष्ट्रातही दुपारच्या वेशळी ऊन डोक्यावर आल्यानंतर तापमानाचा आकडा 35 अंश सेल्सिअसपलिकडे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला इथं नोंदवण्यात आलं असून, इथं आकडा 37.8 अंशांपलिकडे पोहोचल्यानं उष्णतेमुळं नागरिक बेजार झाले आहेत.
मागील 48 तासांपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सूर्य डोक्यावर आल्यानंतर सोसेनासा होईल इतका उष्मा वाढत असून, सायंकाळच्या सुमारास मात्र सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात होत आहे. मुळात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना चटके देणारं ऊन सहन करावं लागत असून, रात्री आणि पहाटेच्या वेळी तापमानात किंचितशी घट नोंदवण्यात येत आहे.
मुंबई शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत पूर्वेकडून उष्ण वारे वाहत आहेत. ज्या कारणास्तव शहराचं कमाल तापमान 34 ते 35 अंशांदरम्यान पाहायला मिळत आहे. रात्री उत्तर पश्चिमेकडून गार वारे वाहत आहेत. ज्यामुळं कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक नोंदवला जात आहे. पुढचे चार दिवस हवामानाचं असंच चित्र कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
देश स्तरावर हवामानाचा अंदाज घ्यायचा झाल्यास, उत्तर भारतासह बहुतांश भागांमध्ये अचानक पावसानं हजेरी लावली आहे. ज्यामुळं पुन्हा एकदा गार वाऱ्यांचं सत्र सुरू झालं असून पुन्हा एकदा इथं थंडीचा कडाका वाढला आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार (IMD) देशाच्या उत्तरेकडे पश्चिमी झंझावात सक्रिय झाला आहे. ज्यामुळं उंच पर्वतरांगांमध्ये 20 ते 21 फेब्रुवारीदरम्यान जोरदार हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, मैदानी क्षेत्रांवरही या शीतलरहींचा परिणाम पाहायला मिळत आहे.
हवामानात झालेल्या या बदलांदरम्यानच दबक्या पावलांनी पाऊस पुन्हा परतला असून, काही प्रमाणात शेतपिकांना नुकसान पोहोचण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे. 22 फेब्रुवारीनंतर पुन्हा एकदा देशाच्या उत्तरेकडे वातावरण कोरडं होणार असून, तापमानात वाढ होण्यास सुरुवात होणार आहे.