Maharashtra News: केस गळती किंवा टक्कल पडणे या समस्येमुळं महिला, तरुण असो की मध्यम वयाचे नागरिकही त्रस्त आहेत. बिघडलेली जीवनशैली आणि वाढते प्रदुषण या कारणांमुळं केस गळतीची समस्या हल्ली सगळ्यांमध्येच दिसत आहे. मात्र, राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात एक भलताच प्रकार समोर आला आहे. शेगाव तालुक्यात केस गळतीची साथ आलीये असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलं आहे.
तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांतील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसांतच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वक्षण सुरू केले आहे. ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.
शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात कारणामुळे केसगळतीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक कुटुंबातील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत. सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत अनेक नागरिक या आजाराचे बळी ठरले आहेत. त्यात महिलांचाही समावेश आहे.
तीनही गावात केसगळती कशामुळं होत आहे. हा नेमका कोणता आजार आहे की कोणत्या उत्पादनामुळं केसगळती होत आहे का? हे अद्याप अस्पष्ट आहे. काही तज्ज्ञांच्या मते शाम्पूने असा प्रकार घडत असावा, असा अंदाज बांधला आहे. मात्र कधीही शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस गळत आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगावात सर्वेक्षण केले. त्यामध्ये केसगळतीच्या आजाराने 30 जण बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, बाधित रुग्णांची संख्या अधिक असून शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.