Maharashtra Government Formation : विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 आमदार निवडून आणत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मोठा स्ट्राईक रेट गाठून भाजप मोठा भाऊ ठरलाय..खातेवाटपातही भाजप मोठ्या भावाच्याच भूमिकेत राहणार आहे. महायुतीत सर्वाधिक मंत्रीपदं भाजपच्या वाट्याला येणार, हे निश्चित झालंय. मात्र त्यापुढे जाऊन आता खातेवाटपातही भाजपची सरशी पाहायला मिळणार आहे. गृह आणि अर्थ ही अत्यंत महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
गृह आणि अर्थ खाते भाजपकडेच राहणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे शिंदेंना गृह खाते देण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय राष्ट्रवादीचं अर्थखातंही भाजप स्वतःकडेच ठेवणार? असल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार नसून भाजपचं सरकार असल्याचा संदेश देशभर जावा याची दक्षता भाजप घेतंय.
भाजपचे 132 आणि पाच अपक्ष मिळून 137चं संख्याबळ आहे. या शिवाय मित्रपक्षांच्या तिकीटावर निवडून आलेले मूळ भाजपचे आमदारांची संख्या वेगळी आहे. जास्त खाती स्वतःकडं ठेऊन मंत्रिमंडळच भाजपमय करण्याचा प्रयत्न असणार आहे. गृहखातं शिवसेनेला नाही मग अर्थखातं राष्ट्रवादीला देऊ नये अशी भूमिकाही शिवसेनेनं घेतली असण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची नाराजी तोंडदेखली दूर करण्यासाठी अजित पवारांना अर्थखातं दिलं जाणार नाही. या सगळ्या गणितात फायदा मात्र भाजपचाच होतोय. कारण अर्थखात्यासारखं मोठं खातं शिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात भाजपकडं आयतंच चालून येणार आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही गृहखातं उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे होतं. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. त्यामुळे गृहखाते त्यांच्याकडेच राहणार असल्याचं समजतंय. त्यातच आता अजितदादांकडे असलेलं अर्थखातं मिळवण्यासाठीही भाजपनं फिल्डींग लावल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाची खाती आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता खातेवाटपातही भाजपची सरशी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.