दिवाळीनंतर आता राजकीय फटाके; महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचाराचा धडाका लावणार

 महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते राज्यभर विविध सभा आणि कार्यक्रम आयोजित करणार असून यातून कमीत कमी वेळात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

पुजा पवार | Updated: Nov 3, 2024, 09:08 PM IST
दिवाळीनंतर आता राजकीय फटाके; महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचाराचा धडाका लावणार  title=
(Photo Credit : Social Media)

Maharashtra Assembly Election : दिवाळीची धामधुम संपल्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रचाराचा धुमधडाका सुरू होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते राज्यभर विविध सभा आणि कार्यक्रम आयोजित करणार असून यातून कमीत कमी वेळात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

राज ठाकरेंची पहिली तोफ ठाण्यात धडाडणार : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊबीजेच्या दिवशी मुंबईतून प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिंदें यांच्या प्रचारापूर्वीच राजकीय फटाके सुरू झाले आहेत. शिंदे यांच्या प्रचारसभेवरून संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. शिंदे हे भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भाजपच्या पखाल्या वाहाव्या लागणार आहेत, अशी टीका राऊतांनी केली. महायुतीनंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचाराची तोफ धडाडणार आहे.  डोंबिवलीच्या पी अँड टी चौकात राज ठाकरे यांची प्रचार सभा होणार असून ठाण्यानंतर राज ठाकरेंची तोफ विदर्भात धडाडणार आहे. याशिवाय यवतमाळच्या वणीमध्ये 5 नोव्हेंबरला, 6 नोव्हेंबरला सोलापूर दक्षिण तर सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर मध्यच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे प्रचारसभा घेणार आहेत. 

हेही वाचा : नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन! कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

 

उद्धव ठाकरे घेणार 25 सभा : 

राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे देखील त्यांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. कोल्हापुरच्या अंबामातेचं दर्शन घेऊन मंगळवारपासून उद्धव ठाकरे प्रचाराचा शुभारंभ करतील ते महाराष्ट्रात जवळपास 25 जाहीर सभा घेणार आहेत. मंगळवारी उद्धव ठाकरेंची राधानगरी आणि रत्नागिरी तसेच राजापूर मतदारसंघात प्रचारसभा होणार आहे. तर गुरूवारी दर्यापूर,तिवसा,बडनेरा आणि बाळापूर मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. तर शुक्रवारी मेहकर त्यानंतर परतूरमध्ये उद्धव ठाकरेंची प्रचार सभा होणार आहे.  शनिवारी उद्धव ठाकरेंच्या सभा हिंगोली,कळमनुरी तसेच परभणी आणि गंगाखेडमध्ये होतील. 
तर 10 तारखेला सांगोला आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. मुंबईत 17 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरेंच्या प्रचाराची सांगता सभा होईल. 

पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा धडाका शुक्रवारपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी पंतप्रधानांच्या दहा प्रचारसभांचे नियोजन करण्यात आले असून धुळे-नाशिक इथून प्रचाराला सुरूवात होणार आहे. मोदी यांची शुक्रवारी धुळे आणि नाशिकमध्ये पहिली सभा होईल. दुस-या दिवशी शनिवारी अकोला आणि नांदेड येथे सभा होणार असून 12 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर,सोलापूर आणि पुणे येथे मोदींच्या जाहीर सभा होतील. तर पंतप्रधानांची शेवटची सभा ही 14 नोव्हेंबर रोजी संभाजीनगर,मुंबई आणि नवी मुंबईत मोदींच्या सभा होणार आहे. 

महाविकास आघाडीची संयुक्त सभा : 

बुधवारी महाविका आघाडीची संयुक्त सभा बीकेसी मैदानावर होणार असून या सभेत शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे संबोधित करणार आहेत. सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. सोमवारनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल त्यानंतर प्रचाराचा धुराळा सुरू होणार आहे.