Congress Maharashtra Loksabha Election list : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. संपूर्ण देशभरात 19 एप्रिलपासून 1 जून अशा सात टप्प्यात मतदान होईल. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यातच आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या 57 लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यात महाराष्ट्रातील नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए 57 लोकसभा सीटों पर कांग्रेस उम्मीदवारों के नाम की तीसरी लिस्ट जारी की गई। pic.twitter.com/7TMkx4faZ4
— Congress (@INCIndia) March 21, 2024
यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच नंदुरबारमधून गोवळ पडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबतच नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत. त्यानंतर आता ही तिसरी यादी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्र राज्यातील काँग्रेस उमेदवारांची ही पहिली यादी आहे. काँग्रेसच्या या यादीनंतर आता पुण्यात रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार आहे. तर नंदूरबारमधून गोवळ पडवी विरुद्ध भाजपच्या हिना गावित अशी लढत होणार आहे.
बुधवारी दिल्लीत काँग्रेसची कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. यानंतर नाना पटोले यांनी बैठकीतील निर्णयावर भाष्य केले आहे. 'महाराष्ट्रातील 18-19 जागांवर चर्चा झाली आणि 12 जागा निश्चित झाल्या आहेत. उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक आहे. आमच्यात एक चर्चा बाकी आहे. ज्यात फायनल होईल. त्यानंतर उद्या किंवा परवा आमच्या सर्व जागा जाहीर होतील', असं नाना पटोले यांनी सांगितले.