Pune Police Nanasaheb Gaikwad Mokka Action : पुण्यातील कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. बेकायदेशीर सावकारकी करणे, खंडणी उकळणे, अपहरण करणे, खुनाचा प्रयत्न, जमीन बळकावणे यांसह अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. नानासाहेब गायकवाड याच्यावर पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांनी याआधीच दोन वेळा मोक्का दाखल केलेला आहे. पण तरीही त्याचे काळे कृत्ये न थांबल्याने शंकरराव गायकवाड, पत्नी नंदा आणि मुलगा गणेश यांच्यावर तिसऱ्यांदा मोक्का दाखल केला आहे.
पुणे शहर पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या तिसऱ्या मोक्का कारवाईला परवानगी दिली आहे. याबाबत चतुश्रृंगी पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता. आता तिहेरी मोक्का कारवाई झालेला नानासाहेब गायकवाड व कुटुंबिय पोलिसांच्या पुन्हा एकदा रडारवर आले आहे. त्याने टोळी म्हणून गुन्हेगारी कृत्य करणारा एक गट तयार केला आहे.
या टोळीने गेल्या 10 वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, एखाद्या व्यक्तीस मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भीती घालणे, फौजदारीपात्र कट रचणे, अनैसर्गिक संभोग करणे, ठकवणूक करणे, ठकवणूक करण्यासाठी बनावटीकरण करणे, अडवणूक करणे, बेकायेदशीररित्या हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे इत्यादी गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. हे सर्व गुन्हे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा आणि इतर फायदा मिळविण्यासाठी सुरु होते. तसेच संपूर्ण परिसरात टोळीचे वर्चस्व राहावे, त्यांची दहशत कायम ठेवून नागरिकांच्या मनात भिती निर्माण व्हावी, यासाठी सातत्याने सुरु असल्याचे निष्पन्न झाले.
काही महिन्यांपूर्वी औंधमधील एनएसजी आय.टी. पार्क, स.नं. 127/ 1 ते 1 ई. प्लॉट नं. 08, सर्जा हॉटेल लेन येथे नवीन इमारत नानासाहेब गायकवाड याच्या मालकीची आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पूर्णत्वाचे दाखल्यासह (Completion Certificate) भोगवटापत्र (Occupancy Certificate) मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह पुणे महानगरपालिकेकडे अर्ज करणे आवश्यक होते. मात्र पुणे महानगरपालिकेचे भोगवाटापत्राशिवाय गायकवाड याने ही जागा स्टेट बँक ऑफ इंडियाला व्यावसायिक वापरासाठी दिली होती. या जागेचा वापर थांबवण्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस महापालिकेच्या वतीने गायकवाडला दिली होती. यानंतर याप्रकरणी महापालिकेच्या तक्रारीनंतर चतुश्रृंगी पोलिसांनी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला होता. पुढे पोलिसांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिसांकडे पाठवला होता.
नानासाहेब गायकवाड याचा प्रस्ताव व त्यासोबत सादर केलेल्या पुराव्याचे, कागदपत्रांचे अवलोकन व छानणी केली असता या गुन्ह्यामध्ये गायकवाड त्याचा व्यावसायिक भागीदार प्रकाश कुलकर्णी, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड आणि इतर अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध गेल्या 10 वर्षात एकापेक्षा अधिक दोषारोपपत्र न्यायालयापुढे दाखल करण्यात आलेली आहेत. त्या अपराधाची न्यायालयाने दखल घेतल्याचे प्रस्तावासोबतच्या कागदपत्रांवरून निदर्शनास येत आहे, असे मोक्काच्या कारवाईत म्हटले आहे. नानासाहेब गायकवाड हा तीन वेळा मोक्का पुण्यातील पहिला गुन्हेगार ठरला आहे. तसेच एकाच कुटुंबातील तिघांवर तिहेरी मोक्का लावण्याचीही ती पहिलीच वेळ आहे. त्याने केलेल्या आर्थिक गुन्हेगारीवर लगाम लावण्याच्या दृष्टीने हा तिहेरी मोक्का लावण्यात आला आहे.