सोलापूर : महाराष्ट्रात आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २० टक्के मतदान झालंय. देशभरात आत्तापर्यंत २१.२७ टक्के मतदान झालं. महाराष्ट्रात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या १० मतदारसंघांत आज मतदान होतंय. आपल्याला अनेकदा दिसतं की मतदान करण्याकरता येणारे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार मतदान केल्यानंतर मीडियाशीही संवाद साधत जिंकण्याचा विश्वास व्यक्त करतात तसंच इतरांनाही मतदानाचं आवाहन करतात. परंतु, आज सोलापुरात वेगळंच चित्रं पाहायला मिळालं. इथं भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींनी मतदानानंतर काही बोललेच नाहीत.
भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी अक्कलकोट तालुक्यातील आपल्या गौडगाव इथं आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपा उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजींचं आज मौनव्रत असल्यानं त्यांनी मीडियासमोर काहीही बोलण्यास नकार दिला... त्यांच्यावतीनं मुखेडचे बिरीप्रकाश महास्वामीजींनी भाजपाच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
दुसरीकडे, सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगी आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. रांगेत उभं राहून त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंसमोर भाजपाच्या जयसिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचं आव्हान आहे. या तिरंगी लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.