Lok sabha Election 2024 : मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करीता मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुटी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल अशा आस्थापनांनी दोन तासांची सवलत मतदारांना द्यावी मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील. मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी हे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या राष्ट्रीय उत्सवात लोकांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, यासाठी सरकार विविध उपक्रम राबवते आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जनजागृती केली जात आहे. याच जनजागृतीचा एक भाग म्हणून आनंदवन येथील अंध विद्यालयाचे कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी पन्नास पैशाच्या पोस्टकार्डवर ''''लोकशाहीचा शुभविवाह'''' ही अनोखी निमंत्रण पत्रिका स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून मतदारांना आवाहन केलेय. यात मतदार आणि लोकशाही यांचा विवाह दाखवण्यात आलाय. ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली, अशांना मतदान करण्याचे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी या पत्रिकेद्वारे दिले आहे. पोस्टकार्डावर आकर्षक अशा वेगवेगळ्या जलरंग पेनचा वापर करीत त्यांनी ही पत्रिका तयार केली. १८ वर्षांवरील विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि युवकांनी आपल्या पालकांना ''''प्रिय आई- बाबा'''' माझ्या उज्वल भविष्यासाठी मतदान करा, असा संदेश यात दिला आहे, तर पोस्टकार्डच्या दुसऱ्या बाजुला मतदानावेळी आपले ओळखपत्र म्हणून ग्राह्य असलेल्या या दहा ओळखपत्रांची माहिती देण्यात आली. ही अनोखी लग्न पत्रिका जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरली आहे.