आता रेल्वेत प्रवाशांना मिळणार दर्जेदार पदार्थ; कोकण रेल्वे देणार ब्रँडेड पॅकेज

Kokan Railway Food Service: कोकण रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेत हे खाद्यपदार्थ मिळणार आहेत.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 2, 2024, 11:23 AM IST
आता रेल्वेत प्रवाशांना मिळणार दर्जेदार पदार्थ; कोकण रेल्वे देणार ब्रँडेड पॅकेज title=
Kokan Railway Passengers can now have a meal from branded food service

Kokan Railway Food Service: लांब पल्ल्याच्या गाड्यामध्ये रेल्वेकडून जेवण पुरवले जाते. मात्र, रेल्वेत दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाच्या सुरक्षेबाबत प्रवाशांकडून नेहमीच नाराजी व्यक्त केली जाते. प्रवाशांच्या या तक्रारीवरुन रेल्वेने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. कोकण रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवासादरम्यान दर्जेदार आणि नामांकित खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. 

अनेकदा रेल्वेत पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये किटक किंवा झुरळ असल्याचे आढळून आले. तसे व्हिडिओ व फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसंच, रेल्वेतील पॅन्ट्रीचे फोटो व्हायरल होत असतात. मात्र आता प्रवाशांना उपलब्ध करुन दिले जाणारे आणि स्थानकांवर विक्री करण्यात येण्याच्या खाद्यपदार्थांच्या दर्जावरही कोकण रेल्वेने लक्ष केंद्रित केले आहे. प्रवाशांकडून विश्वासार्हता मिळवलेले ब्रँडेड पॅकेजचे खाद्यपदार्थ आता उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. तर, स्थानकातदेखील रेल्वेने मान्यता दिलेल्या ब्रँडेड पॅकेजमधील खाद्यपदार्थांचीच विक्री करता येणार आहे. 

रेल्वे स्थानकात प्रोप्रायटरी आर्टिकल डेपो (पीएडी) श्रेणी अंतर्गंत उपलब्ध असलेल्या उत्पादनांचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं बिस्किट, चॉकलेट्स, केक, आयस्क्रीम, चिप्स, नमकीन, एरेटेडसारख्या रोजचे आवडीचे पेय, फळांचे रस इत्यादी दर्जेदार खाद्यपदार्थ आणि पेय प्रवाशांना घेता येणार आहे, कोकण रेल्वेने हे स्पष्ट केले आहे. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मोठ्या संख्येने दादर येथील चैत्यभूमी येथे येतात. अशावेळी प्लॅटफॉर्मवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर 6 डिसेंबर रोजी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नागरिकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.