Karuna Munde Press Conference: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मांना 2 लाखांची देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला आहे. करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखिल कोर्टानं मान्य केला आहे. दरम्यान करुणा मुंडे यांना पत्रकार परिषद घेताना अश्रू अनावर झाले. आपण रखेल नसून, त्यांची पहिली पत्नी आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.
"माझ्या लढ्याला यश आलं आहे. कोर्टाने पहिली पत्नी म्हणून आदेश दिला आहे. बायको नसून, देखभाल खर्चासाठी दिलेला नकार यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. मी कोर्टाच्या निर्णयावर समाधानी नाही. मी या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. माझी दर महिना 15 लाखांची मागणी आहे. माझा 1 लाख 70 हजारांचा घराचा हफ्ता आहे. 7 ते 8 महिन्यापांसून हफ्ता भरलेला नाही. 30 हजारांचा मेंटेनन्स आहे. मुलगा घऱात बेरोजगार बसला आहे. 2 लाखात काय होणार?," अशी विचारणा करुणा मुंडे यांनी केली आहे.
"आज माझ्या घरात या निर्णयावर व्यक्त होण्यासाठी कोणी नाही. आई होती तिचं निधन झालं आहे. महिलांचा लढा खूप मोठा असतो. मी गेल्या 3 वर्षांपासून एकटी लढत आहे. माझ्याकडे पैसे नव्हते, माझे सगळे दागिने विकले आहेत. माझी फार अवघड परिस्थिती होती. बीडवरुन मुंबईला येणं आणि बीडला जाणं," हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, "जिल्हाधिकारी कार्यालयात मला गुंडाने मारहाण केली होती. वाल्मिक कराडसारख्या गुंडाने एका महिलेला मारलं होतं. चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श कऱण्यात आला होता. घरी आल्यावर मी मुलांना सांगितलं होतं. तेव्हा पतीने आई खोटं बोलत असल्याचं सांगितलं. मग मुलांनीही त्यावर विश्वास ठेवला. पण एक बाई खोटं बोलत नाही".
"मी ठेवलेली बाई नाही, मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. हीच माझी लढाई होती आणि आज त्याचाच विजय झाला आहे. मला भारतातील महिलांना एकच सांगायचं आहे की, समोरचा मोठा माणूस आहे, मंत्री, पैसेवाला हे पाहून शांत बसू नका. मी लढाई सुरु केली तेव्हा एक रुपया नव्हता. घर कर्जात होतं. माझी गाडी उचलण्यात आली. आमच्याकडे घराचे हफ्ते भरण्यासाठी पैसे नव्हते", असंही त्या म्हणाल्या.
"माझ्या बहिणीसोबतही शारिरीक हिंसाचार झाला. मला दोन खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं. 45 दिवस मी येरवाडा जेलमध्ये होते. मला कोणी भेटण्यासही आलं नाही. कोण मला काढणार याची वाट पाहत होते. बीडच्या जेलमध्ये मी 16 दिवस होता. कलेक्टर ऑफिसमध्ये मला मारहाण केली जाते. माझ्या गालावर मारलं, चुकीच्या जागी हात लावतो आणि महाराष्ट्रातील कोणताही मुख्यमंत्री काही करत नाही. मी कधीच आत्महत्या केली असती. एकदा प्रयत्नही केला. पण मला मुलांचा चेहरा पाहण्यास सांगण्यात आलं," अशी माहिती त्यांनी दिली आहे.
"धनंजय मुंडे, पोलीस तिथे असताना सर्वांसमोर जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये मला मारहाण करण्यात आली. वाल्मिक कराडने ज्यावेळी मला मारहाण केली तेव्हा मी जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि डीजींना निवेदन दिलं. मला फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या इतकी मागणी होती. पण आजपर्यंत ते मिळालेलं नाही," असा आरोप त्यांनी केला आहे.