लता मंगेशकर यांची पहिली कमाई किती होती माहितीये का? मिळाले होते फक्त 'इतके' रुपये

लता मंगेशकर यांना क्रिकेटची खूप आवड होती तसेच त्यांना महागड्या गाड्यांची देखील आवड होती. लातादीदींनी त्यांच्या गायनाची सुरुवात केली तेव्हा त्यांना पहिली कमाई किती रुपये मिळाली होती, माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही अविस्मरणीय किस्से.

Updated: Feb 6, 2025, 05:29 PM IST
लता मंगेशकर यांची पहिली कमाई किती होती माहितीये का? मिळाले होते फक्त 'इतके' रुपये title=

Lata Mangeshkar: भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचं निधन संपूर्ण देशासाठी दुःखद घटना होती. त्या केवळ एक महान गायिका नव्हत्या तर एक सुस्वभावी आणि अतिशय प्रेमळ व्यक्ती होत्या.

लता मंगेशकर यांच्यासोबत काम करणाऱ्या गायक कलाकारांशी त्या आपुलकीने वागत असत. त्यांची गाणी आजपर्यंत चाहत्यांच्या ओठांवर आहेत. भावगीत असो, चित्रपटातील गाणी असो किंवा भक्तीगीत, लतादीदींनी प्रत्येक गाण्याला सुमधुर आवाजाने सुंदर बनवलं होतं. त्या मराठी भाषिक असून त्यांनी एकूण 36 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

महागड्या गाड्यांची आवड  

लता मंगेशकर यांना स्टायलिश आणि महागड्या कार खरेदी करण्याची खूप आवड होती. त्याच्याकडे एकाहून एक महागड्या गाड्या होत्या. लतादीदींकडे Chevrolet, Buick, Chrysler आणि Mercedes-Benz अशा प्रसिद्ध ब्रँडच्या गाड्यांचे चांगलेच कलेक्शन होते.  यश चोप्रा यांनी लता मंगेशकरांना Mercedes-Benz कार भेट दिली होती. लता दीदींनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला होता आणि ती त्यांच्यासाठी खास असल्याचे सांगितले होते.

पहिली कमाई फक्त 25 रुपये ते कोट्यावधीची मालकिण  

लता मंगेशकर यांनी केवळ 13व्या वर्षी गायन क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या पहिल्या कमाईची रक्कम फक्त 25 रुपये होती. त्यानंतर त्यांनी 50,000 हून अधिक गाणी गायली आणि संपूर्ण जीवनभर अपार संपत्ती कमावली.  त्यांच्याकडे सुमारे 370 कोटी रुपयांची संपत्ती होती. त्यांचे मुंबईतील पेडर रोडवरील प्रभुकुंज भवन हे त्यांचे निवासस्थान होते. लता दीदींनी आपल्या मेहनतीने आणि गाण्यांच्या जोरावर हे वैभव मिळवले.

क्रिकेटची आवड आणि 1983 सालची 'ती' घटना  

लता मंगेशकर यांना क्रिकेट या खेळाची खूप आवड होती. एक काळ होता 1983 चा जेव्हा भारतीय संघ पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून भारतात परतला होता. BCCI ला जिंकलेल्या खेळाडूंना बक्षीस द्यायचे होते. पण तेवढे पैसे उपलब्ध नसल्याने ते शक्य होत नव्हते. आशा वेळी लतादीदींना दिल्ली कॉन्सर्ट करण्याची विनंती केली असता त्यांनी लगेच होकार दिला. हे कॉन्सर्टच्या माध्यमाने BCCI ने पैसे मिळवले तेव्हा लतादीदींच्या मदतीने जिंकलेल्या खेळाडूंना प्रत्येकी 1 लाख रुपये बक्षीस दिलं होतं.

हे ही वाचा: राम कपूरने वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेच्या अफवांना दिले उत्तर, व्हिडीओ शेअर करत उघड केलं सत्य

कोविडमुळे निधन  

लता मंगेशकर यांना कोविड-19 ची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी गायनाच्या क्षेत्रातील महान आत्म्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारतीय संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. जगभरातील लाखो चाहत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. गायन क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे त्या सदैव सर्वांच्या मनात जिवंत राहतील