बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिस गाजवले. त्याने मोठ्या प्रमाणात कमाई केली. मात्र, त्यानंतर त्याचा आतापर्यंत एकही चित्रपट आला नाही. सध्या तो 'किंग' चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर शाहरुख खान हा 'पठाण 2' चित्रपटावर काम करणार असल्याची चर्चा सुरु आहे. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाची वाट पाहत आहेत.
दरम्यान, अशातच आता शाहरुख खानचा 20 वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. 2004 मध्ये शाहरुख खानचा 'मैं हूँ ना' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट 25 कोटी रुपये होते. या चित्रपटाने जगभरात 70.40 कोटी रुपयांची कमाई केली होती.
अशातच आता अशी चर्चा सुरु आहे की, शाहरुख खान आणि फराह खान पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, हे स्पष्ट झाले की हा चित्रपट शाहरुख खान आणि गौरीसाठी खूप खास आहे. कारण हा चित्रपट दोघांनी मिळून बनवला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत चर्चा सुरु आहे.
20 वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार?
फराह खानकडे 'मैं हूं ना 2' साठी काही रोमांचक कल्पना आहेत. तिने हे नियोजन शाहरुख खानला सांगितले आहे. अशातच हा चित्रपट कसा बनवायचा हे जाणून घेतल्यानंतर शाहरुख खान देखील खूप आनंदी असल्याचं म्हटले जात आहे. फराह खान तिच्या लेखन टीम आणि रेड चिलीजसोबत पटकथा तयार करत आहे. रिपोर्टनुसार, शाहरुख खान या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्याचे संपूर्ण लक्ष हे या चित्रपटाला जेवढे यश मिळाले तेवढेच चित्रपटाच्या सिक्वेलला मिळावे.
अशातच एक अशी माहिती देखील समोर येत आहे की, शाहरुख खान कोणत्याही प्रक्रियेत घाई करू इच्छित नाही.'मैं हूं ना'ला किती चाहते आहेत हे त्याला माहिती आहे, म्हणून तो फक्त सिक्वेलसाठी चित्रपट बनवू इच्छित नाही. म्हणूनच त्याने फराह खान आणि लेखन टीमला काहीतरी असाधारण लिहिण्यास सांगितले आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम करायचे की नाही याचा अंतिम निर्णय होणार आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर, शाहरुख खान पुन्हा लष्करी अधिकारी होईल का? हे जाणून घेण्यासाठी चाहेत खूप उत्सुक आहेत.