Pune Crime News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर सावधानी बाळगणे गरजेचे आहे. पुण्याच्या हिंजवडीमध्ये शेअर बाजारात नुकसान झाल्यामुळे, आयटी इंजिनियर चक्क चोर बनला आहे. झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी या इंजिनिअरने चोरीचा मार्ग निवडला. शेअर मार्केटमुळे चोर झालेल्या इंजिनिअरची सध्या पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
निखिल खाडे असं या इंजिनीयरचे नाव आहे. निखिल गेली काही वर्ष आयटी नगरी हिंजवडी मध्ये वास्तव्यास आहे. त्याला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची सवय होती. पाच महिन्यांपूर्वी निखिलला पाच ते सात लाख रुपयांचा शेअर बाजारामध्ये फटका बसला. त्यानंतर झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी त्याने एक वेगळाच मार्ग निवडला. त्याने चक्क मोबाईल आणि लॅपटॉप चोरीला सुरुवात केली. पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या निखिलने आजूबाजूच्याच जवळच्या व्यक्तींना सॉफ्ट टार्गेट करत त्यांचे मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करण्यास सुरू केले. दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान निखिलचं चोर असल्याचं स्पष्ट झालं.
शेअर बाजारामध्ये आमिषाला बळी न पडता गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन शेअर मार्केट एक्सपर्ट करतायेत. झटपट पैसे मिळवण्यासाठी अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूक करतात. मात्र, यामध्ये मार्गदर्शनही तितकचं गरजेचं आहे, शेअर बाजारात झालेलं नुकसान कुणाला गुन्हेगारीच्या जगातही नेऊ शकतं, हेच हिंजवडीतील या घटनेन दाखवून दिल आहे.
पेणमधील वाशीत चोरट्यांनी घरफोडी करुन 1 लाख 34 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात चित्रित झाली. या प्रकरणी वडखळ पोलिसांनाकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तुळजापूरमधील तामलवाडीत अडीच लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्स पकडले आहे. तसेच आरोपींकडून 10 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपीना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.